एआयच्या लाटेचा भारताला फायदा : डॉ. भूषण केळकर
पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ विकसित देशांसाठी मर्यादित नाही, तर भारताने देखील या संकल्पनेला स्वीकारले आहे. या लाटेचा भारताला मोठा फायदा होईल, असा विश्वास ज्येष्ठ आयटी तज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी व्यक्त केला.
टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल या जागतिक पातळीवरील ना-नफा तत्त्वावर कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेचा भाग असलेल्या टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट १२५ तर्फे टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोथरूड येथील एमईएस सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी “रायडिंग द एआय वेव्ह” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट १२५ चे संचालक मिलिंद पटवर्धन, प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर सुशील पवार, क्लब ग्रोथ डायरेक्टर उदय जगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले वक्तृत्व कौशल्य सुधारण्याच्या हेतूने टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट १२५ शी जोडले गेलेले सुमारे ३०० सदस्य या कार्यक्रमात सहभागी झाले होते. संवाद साधताना डॉ. केळकर म्हणाले, “संवाद हा खरोखरच एक कोनशिला आहे, ज्यावर कुठलेही नवीन तंत्रज्ञान उभे राहू शकते. भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अंगीकारण्याच्या उंबरठ्यावर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा पर्याय नाही, हे एक वास्तव आहे. आपली स्पर्धा कृत्रिम बुद्धिमत्तेशी नसून, ती कशी वापरायची हे जाणणाऱ्या लोकांशी आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अडकून न बसता, नवीन संधींकडे बघत आपण सतत नव्या गोष्टी शिकायला हव्यात.”
टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट १२५ चे संचालक मिलिंद पटवर्धन म्हणाले, “आपण एका परिवर्तनाच्या उंबरठ्यावर असून संवाद साधण्याची पद्धत बदलत आहे.”
या कार्यक्रमात वर्षभरातील विविध उपक्रमांमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या टोस्टमास्टर्स डिस्ट्रीक्ट १२५ मधील विविध क्लबांना गोल्ड व सिल्व्हर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
क्लबच्या जागतिक नेटवर्कद्वारे सदस्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून व्यक्तिमत्त्व विकास आणि वक्तृत्व कौशल्य घडवण्यावर टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलचा भर आहे. सन १९२४ मध्ये स्थापन झालेली, १४० हून अधिक देशांतील १४,००० हून अधिक क्लब्समध्ये कार्यरत असलेली टोस्टमास्टर्स ही जगातील अग्रगण्य संस्था बनली आहे.
पुणे, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आणि गोवा राज्यामध्ये डिस्ट्रीक्ट १२५ चे २,००० सदस्यांचे मजबूत संपर्कजाळे असलेले सुमारे १०० क्लब्स कार्यरत आहेत.
