धोरणकर्त्यांनी समस्या आहेत, हे आधी मान्य करायला हवे
पुणे – “कारागृहाच्या आतील आणि कारागृहाच्या बाहेरील समस्यांमध्ये फारसा फरक नाही, हे मला ‘आत’ गेल्यावर समजले. आपली धोरणे चांगली पण प्रशासकीय अडचणींमुळे अंमलबजावणीत अडचणी येतात. त्यामुळे धोरणकर्त्यांनी आधी ‘समस्या’ मान्य करणे गरजेचे आहे, असे मत माजी आयपीएस अधिकारी, विधीज्ञ आणि लेखक रवींद्रनाथ पाटील यांनी येथे व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशन आणि विधीज्ञ वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. तुरुंगवास भोगलेल्या भूतपूर्व आयपीएस अधिकाऱ्याची डायरी, अशा स्वरूपाचे रवींद्रनाथ पाटील लिखित पुस्तक ‘तुरुंगरंग’ या शीर्षकाने रविवारी सकाळी पत्रकार भवन सभागृह, नवी पेठ, येथे प्रकाशित करण्यात आले. न्यायमूर्ती अंबादास जोशी हे या तुरुंगरंग पुस्तकाचे दिशादर्शक आहेत.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, “तुरुंगरंग पुस्तकाचा नायक तुरुंग हाच आहे. त्या नायकाची गोष्ट या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आयपीएस अधिकारी असणारा मी अचानक तुरुंगात कच्चा कैदी म्हणून आलो आणि सराईत गुन्हेगारांमध्ये पोचलो, तेव्हा धक्का बसला. हळूहळू तुरुंग कळू लागला. तिथल्या समस्या लक्षात आल्या. मी तिथे घेतलेले अनुभव डायरी स्वरूपात नोंदवत गेलो. माझ्या लेखनात कुठलीही प्रबोधनाची भूमिका नाही. जे वास्तव पाहिले ते उलगडले आहे. तुरुंगात मला खूप वाचन करण्याची संधी मिळाली. कैद्यांचे संवाद मला अनेक बोलींचे ज्ञान देणारे ठरले. तुरुंगात मी वर्तमानात जगायला शिकलो. भूतकाळाचे ओझे आणि भविष्याची चिंता सोडून दिली. वाचनाने मला सकारात्मक ठेवले आणि तुरुंगातील अनुभव मला स्वतः पलीकडे नेणारा ठरला. जगण्यासाठी एक नवा आणि उच्चतम, असा आदर्श पुढे आला. अधिकारी म्हणून काम केल्याचा अनुभव आणि सोबत धोरणकर्त्यांची मानसिकता, यांची पार्श्वभूमी असल्याने तुरुंग आणि तुरुंगवासी, समजून घेणे शक्य झाले.” या कठीण काळात माझ्या कुटुंबातील सर्वांनी दिलेली साथ फार मोलाची होती, असेही ते म्हणाले.
प्रकाशकाचे मनोगत मांडताना आशिष पाटकर म्हणाले, “एका आयपीएस अधिकाऱ्याच्या निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक वाचकांना स्वतः च्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने कसे बघावे, हे सांगेल. तसेच प्रेरणा देईल.”
मिटकर यांनी तक्रार प्राधिकरणाचे सदस्य म्हणून आलेल्या अनुभवांचे कथन केले. कारागृहातील मुलांसाठी कार्य करण्याची गरज आहे. पिचलेले समाजगट आपल्या मदतीची वाट पाहत आहेत, याची जाणीव करून देणारे हे क्रांतीकारी पुस्तक आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना माजी न्यायमूर्ती जोशी यांनी ‘वस्तुस्थितीनिष्ठ पुस्तक ‘ अशा शब्दांत तुरुंगरंग या पुस्तकाचे वर्णन केले. जे अनुभवले ते वाचले, लिहिले आणि बोलले गेले पाहिजे. तुरुंगांची परिस्थिती सुधारण्यासाठी जनमताचा दबाव वाढला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
विधीज्ञ फाउंडेशनच्या कार्याची माहिती अमरनाथ पाटील यांनी दिली. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.
