‘ऊर्जा’ युवा संगीत सभेचे आयोजन २० ऑक्टोबर रोजी
पुणे : नव्या पिढीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने पुण्यातील मएसो कलावर्धिनी व स्वराधार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी ‘ऊर्जा’ युवा संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम सकाळी १० वाजता सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप शाळेच्या आवारातील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात संपन्न होईल. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल.
सदर कार्यक्रमासाठी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर, मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्षा आनंदी पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
कार्यक्रमाची सुरुवात अनिरुद्ध देशपांडे यांच्या एकल तबलावादनाने होईल. यानंतर कल्याणी देशपांडे यांचे सतारवादन होईल. केदार केळकर यांच्या गायनाने कार्यक्रमाचा समारोप होईल. यावेळी पार्थ ताराबादकर, शंतनू देशमुख आणि कल्पतरू ठाकरे हे साथसंगत करतील, अशी माहिती स्वराधार फाउंडेशनचे संचालक नील दीक्षित यांनी दिली.
