विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी अस्तित्वात उरलेल्या नाहीत – राज ठाकरे
मुंबई: आपले आमदार, खासदार फुटतात. इकडून तिकडे जातात. विचारधारा, निष्ठा वगैरे बाबी अस्तित्वात उरलेल्या नाहीत. कोण कधी कुठल्या पक्षात असेल ते सांगता येत नाही, अशा शब्दात सध्या राजकीय स्थितीचे वर्णन करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी, जे यांचेच राहिले नाहीत, ते तुमचे काय राहणार, असा सवाल राज्यातील मतदारांना केला.
कोणी नेता कुठूनही कुठेही जातो. असतो एका पक्षात तिकीट मागतो दुसऱ्याकडे. जनता यांना भरभरून मते देते. निवडून आणते. नंतर ते याची जाड न ठेवता दुसऱ्याच कुठल्यातरी पक्षात जातात. अशा पद्धतीने आपण महाराष्ट्र कुठे घेऊन जाणार आहोत, असा संतप्त प्रश्न राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केला.
फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तुम्ही काय बोलता?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देखील राज ठाकरे यांनी तोफ डागली. आज शरद पवार आपला पक्ष फोडला, यावरून टीका करतात. फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल बोलतात. प्रत्यक्षात तुम्ही आयुष्यभर काय केले? आधी काँग्रेस फोडली. मग शिवसेना फोडली. नारायण राणेंना फोडले. वोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तुम्ही काय बोलता, असा सवाल त्यांनी पवार यांना केला.
इतिहासातून बाहेर येतच नाहीत उद्धव ठाकरे
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कायम इतिहासातच रमलेले असतात. ते इतिहासातून बाहेर येतच नाहीत. अब्दाली, अफजल खान असंच काही बोलत राहतात, अशी टीका करून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना, महाराष्ट्राबद्दलही काहीतरी बोला, असा सल्लाही दिला.
मराठा आरक्षणाबाबत मार्ग निघणे अशक्य
राज्यात सध्या कळीचा मुद्दा बनलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयाबाबतही राज ठाकरे यांनी भाष्य केले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आपण त्यांच्यासमोरच स्पष्टपणे सांगितले होते की मागणी करताय तर ती पूर्ण करायची कशी तेही सांगा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षण देऊ म्हणून सांगतात. मात्र, ही बाब त्यांच्या अधिकारात नाही. तामिळनाडूमधील वाढीव आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात पडून आहे. मराठा आरक्षणाचा विषय तांत्रिक आणि किचकट आहे. त्यातून सद्यस्थितीत मार्ग निघणे अशक्य आहे. शरद पवार यांच्यापासून सर्व नेत्यांना याची जाणीव आहे, असे ठाकरे म्हणाले.
खोट्या गोष्टी सांगून युवकांच्या भावनांना हात
आरक्षणासारख्या मुद्द्यावर युवकांना खोट्या गोष्टी सांगून त्यांच्या भावनांना हात घातला जातो. मात्र, ही बाब धोकादायक आहे. असे उद्योग करण्यापेक्षा युवकांच्या हाताला काम कसे मिळेल, राज्यात उद्योग कसे येतील, नोकऱ्या कशा मिळतील, रोजगार कसा उपलब्ध होईल, व्यवसाय कसे उभे करता येतील, याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे, असेही ठाकरे म्हणाले.
भाजप या लोकांना घेतो तरी कसा?
अजित पवार भाजपकडे येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. प्रत्यक्षात पवार यांना तुरुंगात टाकण्याऐवजी मंत्रिमंडळात घेऊन टाकले. भाजप अशा लोकांना पक्षात घेतोच कसा, असा सवाल ठाकरे यांनी केला. गुलाबी रंगाचे जॅकेट परिधान करण्याच्या अजित पवार यांच्या कृत्याची ही त्यांनी खल्ली उडवली.
जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तिजोरी खडखडाट
लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा होतील. मात्र, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात राज्याच्या तिजोरीत खडखडाट असणार आहे. सरकारी नोकरांचे पगार द्यायला ही पैसा शिल्लक राहणार नाही. राज्यातील महिलांना फुकट पैसे देण्याची काहीच आवश्यकता नाही. त्याऐवजी त्यांना उद्योग व्यवसाय उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना फुकट वीज देण्याऐवजी खात्रीशीर वीज द्या. यांना लोकांना फुकट घेण्याची सवय लावायची आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
