राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याची जबाबदारी स्वीकारून महायुती सरकारने पायउतार व्हावे
मुंबई: माजी मंत्री आणि नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केलेले नेते बाबा सिद्दिकी यांची त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोन संशयितांना स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे तर तिसऱ्याचा शोध सुरू आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येवरून राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगत असून खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याची जबाबदारी स्वीकारून महायुती सरकारने पायउतार व्हावे, अशी मागणी केली आहे.
काल रात्री साडेनऊच्या सुमारास वांद्रे पश्चिम खेरवाडी सिग्नलजवळ तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्यावर झाालेल्या तीन गोळ्यांपैकी दोन गोळ्या सिद्दिकी यांच्या पोटात व छातीत लागल्या. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दिकी है विद्यार्थी असतानाच राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी दीर्घकाळ काँग्रेस पक्षात काम केले. सन 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. बॉलीवूडमध्ये देखील सिद्दिकी यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त कळताच अभिनेता संजय दत्त याच्यासह सिने क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी रुग्णालयात हजेरी लावली.
https://x.com/PawarSpeaks/status/1845160098701717741?t=P2a4MZU5KQy0VYJ6woNVaQ&s=19
