भाजपला मोठा धक्का; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी
मुंबई : खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षात प्रवेश करत असल्याची घोषणा माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली.
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्याचप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची घोषणा केली.
हर्षवर्धन पाटील हे इंदापूर येथील प्रस्थापित नेते असून अनेक वर्ष राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री पद सांभाळले आहे. मूळचे काँग्रेसचे नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजप शिवसेना युती सरकारच्या काळात अपक्ष आमदारांचे नेतृत्व करून युती सरकारला पाठिंबा दिला. ते सन २०१४ मध्ये पुन्हा काँग्रेसवासी झाले तर सन २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध् प्रवेश केला
शरद पवार यांच्या विरोधात बंड पुकारून अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांचा विद्यमान आमदार असलेला मतदारसंघ त्याच पक्षाला मिळेल, अशी भूमिका आहे. इंदापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गटाचे दत्ता भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे इंदापूर मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार हे निश्चित झाले आहे. अर्थातच यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.
वास्तविक राज्याच्या राजकारणात हर्षवर्धन पाटील यांची भूमिका कायम शरद पवार आणि अजित पवार यांना विरोध करणारी राहिली आहे. इंदापूर, बारामती या जवळच्या मतदार संघावर वर्चस्व असलेले पवार आणि पाटील यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीने हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांना एकत्र आणले आहे.
