फडके म्युझिक क्लासेस यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
पुणे : गायन, पेटी वादन आणि सतार वादन यांमध्ये मग्न झालेले वय वर्षे ८ ते ७१ पर्यंतचे विद्यार्थी आणि सभागृहात भरलेला उत्साह अशा प्रसन्न वातावरणात फडके म्युझिक क्लासेस यांचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
एरंडवणे भागातील सेवाभवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमासाठी जबलपूर येथील प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका अरुणा परांजपे, निवृत्त लेफ्टनंट कर्नल अनंत थत्ते, गुरु आलोक फडके, गुरुमाता प्रभा फडके उपस्थित होते.
गुरु आलोक फडके यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी वय वर्ष ८ ते ७१ वयोगटातील विद्यार्थ्यांनी गायन, पेटी वादन व सतार वादन सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी एकल राग, सामुहिक रागमाला, हिंदी- मराठी गीते यांचे सुंदर सादरीकरण करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. गुरु आलोक फडके यांची रचना असलेल्या गायन व सतार वादनातील रागमालांना रसिकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला.
जर तुमची कोणतीही गोष्ट शिकण्याची प्रबळ इच्छा असेल तर ती गोष्ट तुम्हाला येतेच व त्या करता रियाझ करणे आवश्यक आहे हेही तुम्ही लक्षात घ्यायला हवे असे अरुणा परांजपे यावेळी म्हणाल्या. तुमची प्रबळ इच्छा, रियाज मला आज झालेल्या कार्यक्रमामध्ये दिसून आली अशा शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांनी स्वतः या कार्यक्रमात राग भीमपलास, भजन, तसेच सुफी संगीत यांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सायली सोनटक्के यांनी केले होते तर दीप्ती जोग यांनी सूत्र संचालन केले.
