Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

छंदा सोबतच आता पॉटरीकडे करिअरचा पर्याय म्हणून पहायला हवे

तरुण कलाकारांच्या भावना, चौथ्या ‘पुणे पॉटर्स मार्केट’ला सुरुवात

पुणे  : मातकाम अर्थात पॉटरीकडे अनेकदा छंद, स्वत:ला शोधण्याचे आणि व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते, मात्र आजच्या बदलत्या युगात या सर्जनशील कलेला करिअरमधील एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिले जायला हवे, अशा भावना राज्यभरातून आलेल्या मातकाम कलाकार अर्थान पॉटर्सनी व्यक्त केल्या. निमीत्त होते, पुण्यातील इंद्रनील गरई यांच्या आयजीए गॅलेरियाच्या वतीने आणि भूमी पॉटरी यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात येत असलेल्या ‘पुणे पॉटर्स मार्केट’ या खास प्रदर्शनाचे.

सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉल या ठिकाणी आजपासून सुरु झालेले हे प्रदर्शन रविवार दि २२ सप्टेंबर पर्यंत सुरु असेल. याबरोबरच २७, २८, २९ सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यात देखील या प्रदर्शनाचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे. ‘पुणे पॉटर्स मार्केट’चे हे चौथे वर्ष असून सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान सदर प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनासोबतच मातकामासंबंधी विशेष कार्यशाळांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले असल्याची माहिती या संकल्पनेचे जनक इंद्रनील गरई यांनी दिली

आर्किटेक्चरचे शिक्षण घेतलेल्या पुण्याच्या काश्मीरा श्रीराम यांना ऑरो व्हील येथे केलेल्या इंटर्नशिप नंतर आपली मातकामात असलेली विशेष रुची लक्षात आली. त्यानंतर त्यांनी पॉटरीचे औपचारिक शिक्षण देणारे काही प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले. चिंचवड येथे आपल्या आई वडिलांच्या घरीच त्यांनी त्यांचा पॉटरी स्टुडीओ केला असून करिअर म्हणून आता हेच करायचा ठाम निर्णय घेतला आहे. स्वत:ला व्यक्त होण्यासाठी पॉटरी हे माध्यम काश्मीरा यांना जवळचे वाटते. देशाच्या अनेक भागात होत असलेल्या पॉटरी महोत्सवात काश्मीरा यांनी भाग घेतला असून प्रत्येक ठिकाणाच्या रसिकांची, ग्राहकांची मानसिकता वेगवेगळी असून पुण्या आणि मुंबईमधील नागरिकांचा सकारात्मक अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक तरुण कलाकारांनी पूर्णपणे आपल्या पॉटरी या छंदाकडे करिअरचा पर्याय म्हणून वळावे असे त्यांना वाटते.

समीक्षा बोरीकर म्हणाल्या, माझ्या भाऊ पॉटरी करीत असताना मलाही तो कलाप्रकार आवडू लागला. त्याने पॉटरी करणे पुढे बंद केले तरी मागील तीन वर्षे मी पूर्णपणे यामध्येच कार्यरत आहे. हिमाचल प्रदेशातील आंद्रेट्टा या ठिकाणी मला खऱ्या अर्थाने मातकलेशी समर्पित असलेले अनेक कलाकार जवळून पहायला मिळाले आणि त्यामधूनच मला खरी प्रेरणा मिळाली. आई वडील या दोघांनीही माझ्या छंदाला पूर्ण पाठींबा दिल्याने मला त्याचे करिअरमध्ये रुपांतर करणे बरेच सोपे झाले.

बंगळूरू येथील उल्लास्कर दे म्हणाले, “मागील ५० वर्षे मी बंगळूरूमधील एका संस्थेच्या माध्यमातून विशेष विद्यार्थ्यांना मातकला शिकवित होतो. आता मला स्वत:च्या कलेला वेळ देत काळानुरूप अनेक प्रयोग करून पहायचे आहेत. त्याप्रमाणे मी काम करीत आहेत. टेराकोटाच्या वस्तूंसोबत माझे प्रयोग सुरु असून यासाठी कोणत्या गोष्टी वापरता येतील, त्यावर कशी पद्धतीने नक्षीकाम करता येईल यावर काम सुरू आहे.” मातकलामध्ये तुम्ही जेवढे शिकण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्या नवनवीन गोष्टी तुम्हाला गवसतील, असेही दे यांनी नमूद केले.

काही कामानिमित्त प्रागला गेलो असता तेथील सिरॅमिक मधील काम पाहून आपल्याला हेच करायचे आहे हे मी ठरवून टाकले. मागील १० वर्षे मी मिनीएचर आर्टमध्ये काम करत असून त्याद्वारे अनेक गोष्टी साकारतो असे अजय अभ्यंकर म्हणाले. मी विकेंड आर्टिस्ट आहे आणि आनंदासाठी ही कला जपतो, असेही त्यांनी नमूद केले.

या पॉटरी फेस्टिव्हलमध्ये प्रामुख्याने स्टुडीओ पॉटर्स आणि आपल्या कलेला हाताने मूर्त रूप देणाऱ्या  तब्बल ४०  कलाकारांनी सहभाग घेतला आहे. दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या, वापरात येणाऱ्या मातीच्या वस्तू, सिरॅमिकमध्ये बनविलेली शिल्पे, भित्तिचित्रे, दागिने आणि विशेष कलाकृती पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकरांना मिळणार आहे. पुणे, मुंबई, बंगळूरू, हैदराबाद, आग्रा, भोपाळ, कलकत्ता, रायगड आणि अजमेर अशा महत्त्वाच्या शहरांमधून मातकाम कलाकार आपल्या शहराची खासियत असलेल्या मातेच्या वस्तू यामध्ये प्रदर्शित करतील. मातीच्या वस्तूंसोबतच दगड आणि टेराकोटा पासून बनविलेली भांडी, वस्तू यांचाही समावेश प्रदर्शनामध्ये असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading