Pune : भाजपात असलेला ‘हा’ माजी आमदार ‘तुतारी’ वाजवणार
पुणे: = वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बापू पठारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी करणार असून तुतारीच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक ही लढवणार आहेत. पठारे यांच्या घरवापसीमुळे भाजपला मोठा धक्का बसणार आहे.
पठारे कुटुंब हे वडगाव शेरीच्या राजकारणातील मोठे प्रस्थ आहे. P वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार ही बाब निश्चित असून टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे अर्थातच बापू पठारे यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित केले असून तसे त्यांनी मतदारसंघातील एका गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. या पक्षाकडून आपण विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे.
