Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमित शहा यांची महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना

मुंबई: प्रतिनिधी 

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे निवडणूक रणनीतीकार अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना महायुतीतील बोलघेवड्या नेत्यांना आवर घालण्याची सूचना केली. महायुती म्हणून सर्व घटक पक्ष एकत्र असल्याचा संदेश मतदारांपर्यंत जाण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.

शहा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून रविवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांच्याशी निवडणुकी संदर्भात खलबते केली. मागील काही काळापासून महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांकडून काही वादग्रस्त विधाने केली गेली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी विधाने केली जाऊ नयेत आणि घटक पक्षातील नेत्यांनी एकमेकांच्या उखाळ्या पाखळ्या काढून मतभेद जाहीर करू नयेत, याची काळजी घेण्याच्या सूचना शहा यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिल्या. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांबद्दल पसरविल्या जाणाऱ्या संभाव्य कथितांना (नरेटीव्ह) सडेतोड प्रत्युत्तर द्या, असेही त्यांनी सांगितले. 

निवडणूक प्रचारादरम्यान राज्य सरकारने जाहीर केलेल्या आणि अमलात आणलेल्या विविध कल्याणकारी यांनी, निर्णय आणि धोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी अपेक्षा ही शहा यांनी व्यक्त केली. 

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या अनुषंगाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाच्या अहवालावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विद्यमान आमदारांपैकी काही आमदारांचे काम समाधानकारक नसल्याकडे शहा यांनी लक्ष वेधले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देताना निवडून येण्याची क्षमता काटेकोरपणे तपासली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

शहा यांनी दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाचेही त्यांनी दर्शन घेतले. 

‘… आणि गृहमंत्री मुंबईत मारत आहेत मजा’ 

एकीकडे दीड वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. त्या भागात नुकतेच अनेक महिलांवर अत्याचारही झाले. जम्मू कश्मीर मधील दहशतवादही तोंड वर काढत आहे. देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी अस्वस्थ असलेल्या मणिपूर आणि जम्मू-काश्मीरला भेट देणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात केंद्रीय गृहमंत्री मुंबईत मजा मारत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading