Sunday, June 7, 2026
Latest NewsNATIONALSportsTOP NEWS

बजरंग पुनियाला काँग्रेस न सोडल्यास जीवे मारण्याची धमकी

सोनपत: वृत्तसंस्था 

कुस्तीच्या रिंगणातून बाहेर पडून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेल्या बजरंग पुनिया याला काँग्रेस न सोडल्यास जीवे मारण्याची धमकी परदेशातील दूरध्वनीवरून देण्यात आली आहे. राजकारणापासून दूर न राहिल्यास तुझ्या कुटुंबाचेही काही खरे नाही, असेही धमकी देणाऱ्याने म्हटले आहे. 

तांत्रिक कारणाने ऑलिंपिक पदक गमवावे लागलेली महिला कुस्तीगीर विनेश फोगट आणि ऑलिंपिक कुस्तीगीर बजरंग पुनिया यांनी नुकताच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसने विनेशला हरियाणातून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे तर बजरंग पुनिया याला किसान काँग्रेसचे कार्याध्यक्षपद देण्यात आले आहे. 

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याकडून महिला कुस्तीगीरांचे शोषण होत असल्याचा आरोप करून विनेश आणि काही महिला कुस्तीगीरांनी आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला बजरंग ची साथ होती. त्यावेळी हे आंदोलन काँग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोप ब्रिजभूषण यांनी केला होता. 

विनेश आणि बजरंगने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही ब्रिजभूषण यांनी त्यांच्यावर टीका केली. विनेशने इतरांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यामुळेच तिचे ऑलिम्पिक पदक हुकले, असे विधान त्यांनी नुकतेच केले आहे. 

हरियाणा विधानसभा निवडणूक तोंडावर असताना ब्रिजभूषण यांच्या वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजप नेतृत्वाने ब्रिजभूषण यांना माध्यमांद्वारे जाहीर वक्तव्य करण्यास मनाई केली आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading