Monday, June 8, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

पुणे : ओम नमस्ते गणपतये… ओम गं गणपतये नमः:… मोरया, मोरया… च्या जयघोषाने तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. पारंपरिक वेशात मध्यरात्री १ वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरीता हजेरी लावण्यास सुरुवात केली. गणेश नामाचा जयघोष करीत अथर्वशीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३२ व्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे, वृषाली श्रीकांत शिंदे, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी यांसह शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव, प्रा.गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले.

दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला. उपक्रमाचे ३९ वे वर्ष होते.

डॉ.अरुणा ढेरे म्हणाल्या, बुद्धी हीच खरी शक्ती आहे. सर्व महिला आज गणरायाकडे बुद्धी मागायला मोठ्या संख्येने आल्याचे चित्र प्रेरणादायी आहे. प्रत्येक कार्यामागे बुद्धी आहे, एक विचार असतो. जे काही करतो, ते आपण बुद्धीपूर्वक करायला हवे. आज बाहेरील परिस्थिती बदलत चालली आहे. त्यामुळे महिलांनी आपली शक्ती जागृत करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading