Sunday, June 7, 2026
BusinessLatest NewsPUNE

प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार प्रदान

पुणे : प्रवीण मसालेवालेचे संस्थापक आदरणीय स्व. हुकमीचंद (भाऊ) चोरडिया आणि स्व. सौ. कमलबाई चोरडिया (बाई) यांच्या प्रेरणेने प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारे सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार आज सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण डॉ शां ब मुजुमदार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. घोले रस्त्यावरील पं जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे सदर कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रविण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, सुहाना कमल पुरस्कार समितीच्या अध्यक्षा व माजी खासदार वंदना चव्हाण, प्रविण मसालेवाले ट्रस्टचे विश्वस्त राजकुमार चोरडिया, मधुबाला चोरडिया, विशाल चोरडिया, आनंद चोरडिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मधुबाला चोरडिया यांच्या ‘बिकट वाट यशाची’ या पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे प्रकाशन देखील यावेळी डॉ शां ब मुजुमदार यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रवीण मसाले समूहाचा प्रेरणादायी प्रवास यामध्ये मांडण्यात आला आहे.

यावेळी ज्येष्ठ समाजसेविका, माजी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू आणि ‘कनेक्टिंग’ या समाजसेवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अर्णवाझ दमानिया यांना सुहाना कमल जीवनादर्श पुरस्कार, ज्येष्ठ समाजसेविका आणि माहेर आश्रमच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन यांना सुहाना कमल सेवा सन्मान पुरस्कार, आर्टेमिस टेक प्रा लिमिटेडच्या कोमल वागसकर यांना सुहाना कमल उद्यम सन्मान पुरस्कार तर सांगली येथील पयोद इंडस्ट्रीजच्या स्नेहल व देवानंद लोंढे यांना सुहाना कमल युगल उद्यम सन्मान पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, मानचिन्ह आणि ५१ हजार रुपये रोख असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

आज ज्या ज्या महिलांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्यामध्ये उद्योग करण्यासाठी आवश्यक असलेले कसोटी, सचोटी आणि हातोटी या वृत्ती आहेत असे सांगत डॉ शां ब मुजुमदार म्हणाले, की आज विविध क्षेत्रात नावलौकिक असलेल्या नऊ महिलांच्या समितीने पुरस्कार्थी महिलांची निवड केली आहे. पण मला हे पुरस्कार देण्यासाठी बोलावले ही माझ्यासाठी गौरवास्पद बाब आहे.” राजकुमार चोरडिया हे फर्गसन महाविद्यालयातील माझे विद्यार्थी होते. तर विशाल चोरडिया आणि आता त्यांची पुढील पिढी देखील सिम्बायोसिस मध्ये शिक्षण घेत आहे असे सांगत डॉ मुजुमदार यांनी चोरडिया परिवाराशी असलेले आपले नाते उलगडले.

दमानिया यांबद्दल बोलताना डॉ मुजुमदार म्हणाले, आज समाजात आत्महत्या आणि मानसिक आजार हे ‘कॉमन’ विषय झाले आहेत. या क्षेत्रात दमानिया करीत असलेले काम महत्त्वाचे आहे. भारतात दरवर्षी आत्महत्या करणाऱ्यांची संख्या ही १ लक्ष ८० हजार इतकी असून पुणे शहरात वर्षभरात तब्बल १ हजार ४५० नागरिक आत्महत्या करतात, त्यामुळे दमानिया यांचे काम सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. हा विषय केवळ कुटुंबात विषय नसून तो एक सामाजिक समस्येचा विषय आहे, असेही मुजुमदार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “जेव्हा एखादी मुलगी शिकते तेव्हा ती स्वत:ची आणि कुटुंबाची प्रगती साधते मात्र जेव्हा हीच स्त्री उद्योग व्यवसायात उतरते तेव्हा ती पुढच्या अनेक पिढ्यांना व्यवसायात आणत असते. प्रविण मसालेवाले हे याचेच द्योतक आहे असे मला वाटते. त्यामुळे महिलांना उद्योग क्षेत्रात मिळालेला यश आज साजरे करायला हवे आहे. आज येथून मी अनेक प्रेरणादायी कथा घेऊन जात आहे. महिलांचे यश साजरे करण्यासाठी कोणत्याही दिवसांची गरज नसते हे आजच्या या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित झाले आहे.”

सिस्टर लुसी कुरियन यांनी समाजसेवेच्या क्षेत्रात येण्यामागील भावनिक प्रवास आणि समाजातील परिस्थिती कथन केली. कोमल वागसकर यांनी आपल्या संस्थेबद्दल माहिती दिली. स्नेहल लोंढे यांनी आपल्या स्वत:च्या गावापासून सुरु केलेला व्यवसायाचा प्रवास कसा जगभर परसात आहे याची माहिती दिली.

आजवर अनेक पुरस्कार मिळाले पण हा पुरस्कार हदयाच्या जास्त जवळचा आहे असे सांगत अर्णवाझ दमानिया म्हणाल्या, “आजचा हा सन्मान माझ्या शहरात होत आहे याचा विशेष आनंद आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये ताकद असते तिला फक्त संधीची, प्रेरणेची गरज असते. मुलींनी खेळाला प्राधान्य द्यायला हवे आहे. यातून शारीरिक ताकद मिळतेच शिवाय अनेक संधींचे दरवाजे देखील त्यांसाठी उलगडतात.”

स्वागतपर प्रास्ताविक करताना विशाल चोरडिया म्हणाले, “प्रत्येक उद्योजकाचा लढा हा कायमच प्रेरणादायी असतो, हे आम्ही आमचे आजी आजोबा यांच्या रूपात जवळून पाहिले आहे. हा पुरस्कार सोहळा आमच्यासाठी म्हणूनच भावनिक नाते असलेला आहे. आम्ही समाजात जेव्हा अशा लढ्याच्या कथा पाहतो तेव्हा कायमच आम्ही आजी आजोबांच्या आठवणीत हरवतो. सुरुवातीला आम्ही उद्योग जननी कमल पुरस्कार या नावाने उद्योजक महिलांना पुरस्कार द्यायचो, मात्र आमच्या आजीची अनेक रूप आम्ही अनुभवीली त्या पत्नी, आजी, आई होत्याच यासोबतच त्या एक खंबीर नेतृत्व असणारी स्त्री होत्या, दाता होत्या. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आयाम दर्शविणारे पुरस्कार दिले जावेत या उद्देशाने आम्ही यावर्षी पासून चार क्षेत्रात पुरस्कार देणे सुरू केले. ज्याप्रमाणे आजी आजोबांचा प्रविण मसालेवाले हा ब्रँड पुण्यातून देशभरात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला त्याप्रमाणे यावर्षी महाराष्ट्रापुरता असलेला हा पुरस्कार देखील पुढील वर्षीपासून आम्ही व्याप्ती वाढवत राष्ट्रीय स्तरावर नेत आहेत याचा आम्हाला आनंद आहे. आजच्या या पुरस्कार्थी महिला या उद्योग क्षेत्रासाठी नव्हे तर राष्ट्र निर्माणामध्ये आदर्श ठरतील असा विश्वास विशाल चोरडिया यांनी व्यक्त केला.

वंदना चव्हाण म्हणाल्या, “देशामध्ये रोज मुली महिलांवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या वाचत, पहात असताना आज पुण्यात प्रविण मसालेवाले ट्रस्टच्या वतीने समाजात विविध क्षेत्रात अतिशय चांगले, उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा होत असलेला सत्कार ही मोठी बाब आहे. या पुरस्काराद्वारे महिलांना प्रोत्साहित करण्याचे, त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचे आणि आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत हा विश्वास देण्याचे काम ट्रस्ट करीत आहे.” या पुरस्काराच्या निवड समितीत देखील राज्य आणि देशातील महत्त्वाच्या महिला असल्याचा आनंद आहे असे मत वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

हे पुरस्कार वितरीत करीत असताना ते निरपेक्षपणे दिले जावेत या हेतूने ट्रस्टच्या वतीने आयोजन व निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे. माजी खासदार वंदना चव्हाण या समितीच्या अध्यक्षस्थानी असून समितीमध्ये मुंबईच्या माजी महापौर निर्मला सामंत – प्रभावळकर, माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर, न्यायाधीश शालिनी फणसळकर – जोशी, जेष्ठ पत्रकार विजया पाटील, शिक्षणतज्ज्ञ स्वाती मुजुमदार, उद्योजिका सुलज्जा फिरोदिया मोटवानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांचा समावेश आहे.

राजकुमार चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आनंद चोरडिया यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading