Friday, May 29, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

जपानमध्ये तयार झालेल्या क्यूडेंगा या प्रतिरोधकाच्या वैद्यकीय चाचण्या देशात करण्याची परवानगी

नवी दिल्ली:  एकीकडे देशाच्या अनेक भागात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत असताना त्याला रोखण्यासाठी जपानमध्ये तयार झालेल्या क्यूडेंगा या प्रतिरोधकाच्या वैद्यकीय चाचण्या देशात करण्याची परवानगी देण्याचा विचार भारतीय औषध नियामक करीत आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास भारताला डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी प्रभावी प्रतिरोधक औषध उपलब्ध होणार आहे.

सध्या भारतात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या डेंग्यूचा धोका असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या 30 क्रमांकाच्या आत आहे. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 32 हजार 91 एवढी असून या विकाराने आत्तापर्यंत 32 जणांचे बळी घेतले आहेत. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डीइएनव्ही विषाणूचे चार प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. यापैकी पहिल्या दोन प्रकारच्या विषाणूमुळे कोणतीही लक्षणे नसलेला संसर्ग, साधा ताप, स्नायू दुखी असे विकार होऊ शकतात तर विषाणूंचा तिसरा आणि चौथा प्रकार जीवघेणा आहे. तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारच्या विषाणूंचा संसर्ग झाल्यास रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण वेगाने कमी होणे यापासून ते एकेक अवयव निकामी होणे अशी लक्षणे दिसून येतात. यामुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी याआधी अमेरिकेत डेंगवॅक्सिया ही लस विकसित करण्यात आली आहे. सन 2015 पासून अमेरिका आणि युरोप सह 20 देशांमध्ये या लशीच्या वापराला अनुमती आहे. मात्र ही लस वादग्रस्त ठरली असून जगभरात मागणी नसल्याने या लसीचे उत्पादन सन 2026 पासून थांबवण्याचा निर्णय उत्पादकांनी घेतला आहे. फिलिपाईन्समध्ये सन 2017 मध्ये डेंग्यूची साथ पसरलेली असताना शाळांमध्ये मोठ्यापार्श्वभूमीवर औषधाचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना डेंग्यूची जीवघेणी लागण झाली आणि अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.

या पार्श्वभूमीवर क्यूडेंगा या लशीच्या वैद्यकीय चाचण्या यशस्वी ठरल्यास भारताला डेंग्यूचा सामना करताना मोठा दिलासा मिळू शकतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading