Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पुरोगामी महाराष्ट्र उलट्या दिशेने चालला आहे – राज ठाकरे

नागपूर:  महाराष्ट्रात फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीच सुरू केले. आजचे राजकारणापुरते मर्यादित न राहता घराघरात शिरले आहे, या आरोपाचा पुनरुच्चार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. 

विधानसभा निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांची नागपूर येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर रवी भवन येथे मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. 

सध्या राजकारणाचा चिखल झाला आहे. पुरोगामी महाराष्ट्र उलट्या दिशेने चालला आहे. फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण केले जात आहे. या सर्व परिस्थितीला शरद पवार हेच कारणीभूत आहेत. त्यांनी सन 1990 पासून फोडाफोडी आणि जातीभेदाचे राजकारण सुरू केले. राष्ट्रवादी काँग्रेस जन्माला आली त्याचवेळी हे सर्व सुरू झाले. शिवसेनेतून गणेश नाईक आणि नारायण राणे यांच्यासारखे नेते बाहेर पडले, त्याला देखील पवार हेच कारणीभूत आहेत, असा आरोप ठाकरे यांनी केला. 

राज ठाकरे यांचा करिष्मा आणि लोकप्रियता याचे रूपांतर मतदानामध्ये होत नसले तरीही कधी ना कधी मतदार सत्तेची किल्ली मनसेच्या हाती देतील, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाची अवस्था सन 1952 मध्ये याहूनही अधिक बिकट होती. मात्र, आता देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिला आहे. त्याचप्रमाणे मनसे देखील सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. 

लोक पैसे घेतील पण मते देणार नाहीत 

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे यांनी टीका केली. लोक आता हुशार झाले आहेत. ते मिळत असतील तर पैसे घेतील. मात्र, मत देतील असे नाही, असे ठाकरे म्हणाले. 

राज्यभरात लढवणार 225 जागा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभरात 225 विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार उभे करणार आहे. निवडून येण्याची क्षमता असेल अशा ठिकाणी महिलांना देखील उमेदवारी देण्यात येईल. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेचा उमेदवार रिंगणात असेल. त्या मतदारसंघात मनसेचे तब्बल 37 हजार निष्ठावान मतदार आहेत, असा दावा राज ठाकरे यांनी केला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading