केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर खुद्द शरद पवार यांनाच शंका
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रात झेड प्लस सुरक्षा ही खरोखरच त्यांच्या काळजीपोटी देण्यात आली आहे की त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आलेली युक्ती आहे, अशी शंका खुद्द शरद पवार यांनीच व्यक्त केली आहे.
शरद पवार यांना राज्य सरकारच्या गृह विभागाकडून कायमस्वरूपी सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात वाढ करून केंद्र सरकारच्या गृह विभागाने देखील पवार यांना नुकतीच केंद्राची झेड प्लस सुरक्षा प्रदान केली आहे.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीवरून महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवार यांच्यासह अनेक नेत्यांच्या गाड्या अडवून मराठा आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवरून जाब विचारला आहे. या परिस्थितीचा विचार करूनच सुरक्षा यत्रणांनी केलेल्या शिफारसीवरून पवार यांची सुरक्षा वाढविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, पवार यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या भेटू बाबत शंका व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आपल्या मतदारांशी, विविध नेत्यांशी भेटीगाठी सुरू होतील. दौरे सुरू होतील. याबाबतची बित्तंबातमी काढण्यासाठीच केंद्रीय गृहमंत्रालयाने आपल्याला केंद्रीय सुरक्षा प्रदान केली असावी, अशी शंका पवार यांनी व्यक्त केली.
