शनिवारी पुकारलेला बंद राजकीय स्वरूपाचा नाही – उद्धव ठाकरे
मुंबई: बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजनेला अर्थ आहे. शाळेत विद्यार्थिनी असुरक्षित असतील तर मुलगी शिकली, प्रगती झाली.. अशा घोषणांना काय अर्थ राहतो, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. बदलापूर लैंगिक अत्याचारांच्या निषेधार्थं महाविकास आघाडीने 24 तारखेला पुकारलेला बंद राजकीय स्वरूपाचा नसून माता-भगिनींच्या सुरक्षिततेबाबत सजग आहोत हे दाखवण्यासाठी सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना संकटाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्राने एक कुटुंब असल्यासारखे एकत्र येऊन संकटाचा मुकाबला केला. समाजातील विकृतींचा सामना करतानाही तशीच एकजूट दाखवण्याची गरज आहे. त्यामुळे बदलापूरमधील प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि माता भगिनींच्या सुरक्षिततेबाबत जागरूक असल्याची जाणीव करून देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आपण माता, भगिनी आणि बांधवांना करत आहोत, असेही ठाकरे म्हणाले.
निर्भया प्रकरणानंतर सगळं देश खडबडून जागा झाला. काही दिवसांपूर्वी प बंगालमध्ये असाच प्रकार घडला. त्याचा निषेधही देशभरात करण्यात आला. बदलापूर येथे घडलेल्या प्रकारही तशाच पद्धतीचा असून पुन्हा असे कृत्य करण्यास कोणाचीही हिंमत होऊ नये, यासाठी बंद आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलन किंवा 24 तारखेला होणारा बंद यात कोणताही राजकीय उद्देश नाही. जेव्हा सहनशीलतेचा अंत होतो त्यावेळी उद्रेक होतो, असेही ठाकरे म्हणाले.
चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार होतो तरीही पोलीस दहा दहा तास त्यावर कोणतीही कारवाई करत नसतील, तर सामान्य जनतेने काय करावे, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, परवापासून जे काही घडत आहे त्यात कोणतेही राजकारण नाही. तो जनतेच्या मनात उत्पन्न झालेला संताप आहे. त्याला वाचा फोडण्यासाठीच 24 तारखेचा बंद पुकारण्यात आला आहे.
बदलापूर हे मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात येते. बदलापूर मध्ये जनतेच्या संतापाचा आगडोंब उसळला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीला बहिणींकडून राख्या बांधून घेत होते. हा निर्लज्जपणाचा कळस झाला. विकृत मानसिकतेतून घडलेल्या या प्रकाराचा निषेध करणे हे मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर ते देखील विकृत आहेत. विकृतांचे पाठीराखे आहेत. ते घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. निषेध करणे हे राजकारण कधीपासून वाटू लागले? आता कशाचा निषेध सुद्धा करायचा नाही का, असे सवालही ठाकरे यांनी केले.
