Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुख्यमंत्र्यांनी आता लाडका गद्दार, लाडका बेईमान योजना आणाव्यात – खासदार संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड येथे बोलताना लाडका शेतकरी योजना आणि अभियानाची घोषणा केली आहे. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी आता लाडका गद्दार, लाडका बेईमान अशा योजना आणाव्या, असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना महायुती सरकारने युवकांना रोजगारक्षम बनविणाऱ्या लाडका भाऊ योजनेची घोषणा केली. आता लाडका शेतकरी ही योजना देखील जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यभर लाडका शेतकरी अभियान राबवून शेतकरी हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत, ई पीक पाहणीची सक्ती रद्द करणे, यांचा त्यात समावेश आहे.

लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनांसह आता लाडका शेतकरी योजनेवरही टीका करताना संजय राऊत म्हणाले की, सध्या मुख्यमंत्र्यांना लाडके गद्दार, लाडके बेईमान अशा योजना अमलात आणण्याची आवश्यकता आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता गेल्यावर त्यांना आपल्याबरोबर असलेल्या गद्दारांना सांभाळावे लागणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा संशयग्रस्त आत्मा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर सुरू झालेले पालकांचे आंदोलन हायजॅक करून त्याला राजकीय वळण देण्यात आले, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने विरोधकांवर केला आहे. या आरोपावरही राऊत यांनी पलटवार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संशयग्रस्त आत्मा आहेत. त्यांचा दिवसातला निम्मा वेळ जादूटोणा, तंत्र मंत्र, अंधश्रद्धा यामध्ये जात असतो. त्यांच्या डोक्यात कायम संशयाचे भूत असते. त्यामुळे त्यांना हा संशय येणे स्वाभाविक आहे, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री खोटारडे आहेतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यापेक्षाही अधिक खोटारडे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. पीडित मुलींच्या आईची तक्रार पोलिसांनी तब्बल दहा तास नोंदवून घेतली नाही. हे देखील विरोधकांनीच केले असे सत्ताधाऱ्यांना म्हणायचे आहे काय, असा सवालही त्यांनी केला. वास्तविक बदलापूर आंदोलनाचे पडसाद राज्यभर सर्वत्र उमटले. याकडे जर उघड्या डोळ्यांनी बघितले तर वस्तुस्थिती काय आहे हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading