…. तर राज्यात अस्थिरता; निवडणूकपूर्व सर्वेक्षण अहवाल
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्रात आत्ताच्या परिस्थितीत निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी सत्तेपासून दूर राहील. महायुतीलाही पूर्ण बहुमत न मिळाल्याने सत्तेसाठी तडजोड करावी लागेल. त्यामुळे राज्यातील सरकार अस्थिर असेल, असे एका निवडणूकपूर्व सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने नुकताच जम्मू काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. लवकरच झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यातही विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने टाइम्स नाऊ नवभारत आणि मॅटराईज या संस्थांनी निवडणूकपूर्व सर्वेक्षण करून त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
या अहवालातून आत्ताच्या घडीला मतदारांची नेमकी मानसिकता काय आहे, याचा अंदाज व्यक्त झाला आहे. राज्यात आता निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्ष सर्वाधिक 95 ते 105 जागांवर विजय मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरेल. मात्र, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या पदरी फारसे काही पडणार नाही. शिंदे गटाला केवळ 19 ते 24 जागा मिळतील तर अजित पवार गटाला केवळ सात ते बारा जागांवर समाधान मानावे लागेल, असे हा अहवाल सांगतो. अर्थातच महायुती बहुमतापासून दूर राहणार असल्याने सत्ता स्थापनेसाठी त्यांना जुळवाजुळव करावी लागणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 42 ते 47 जागा मिळतील. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीतही दमदार कामगिरी करत 23 ते 28 जागांवर विजय मिळवेळ. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 26 ते 31 जागांवर समाधान मानावे लागेल. अर्थातच महाविकास आघाडी सत्तेपासून दूरच राहील, असे या निवडणूकपूर्व अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
