Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

समाजात एकता, बंधुभाव टिकविण्याचे ध्येय हवे – माजी पोलीस अधिकारी वसंत कोरगांवकर 

पुणे : भारताचा तिरंगा ध्वज हा आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. मात्र, त्या तिरंगा ध्वजाप्रती व देशाप्रती असलेले प्रेम आपल्या कृतीतून व्यक्त व्हायला हवे. समाजात एकता, बंधुभाव टिकविणे आवश्यक आहे. मात्र, ते टिकविणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी व ध्येय असायला हवे, असे मत निवृत्त पोलीस अधिकारी  वसंत कोरगांवकर यांनी व्यक्त केले.

निसर्गऋण वेलफेअर फाऊंडेशन आणि विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट तर्फे पुणे मनपा घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील सफाई कर्माचा-यांना शिधा व राष्ट्रध्वज वाटप कार्यक्रमाचे आयोजन मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिका येथे करण्यात आले होते. यावेळी भाजपा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजेश पांडे, पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र मानकर, रवींद्र साळेगावकर, फाऊंडेशनच्या संस्थापिका अर्चना सोनावणे, मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील पांडे, गुणेश साने आदी उपस्थित होते.

राजेश पांडे म्हणाले, समाजाप्रती आपले कर्तव्य आहे. समाजाविषयी संवेदनशीलता असेल, तर चांगले काम होउ शकते. अखंड भारत दिनाचा संकल्प आज आपण करायला हवा. समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. हा आपला संस्कार असून स्वच्छता कर्मचारी सन्मान होणे आवश्यक आहे.

राघवेंद्र मानकर म्हणाले, हर घर तिरंगा अभियान पुण्यामध्ये सर्वत्र सुरु आहे. भारतीयांमध्ये देशभक्तीची जागृती व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे. स्वच्छता कर्मचारी हा समाजाचा महत्वाचा घटक आहे. आपल्या सर्वांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यामागे त्यांची मोठी भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. अभिजीत मोडक यांनी सूत्रसंचालन केले. भूषण मोरे यांनी प्रास्ताविक केले. अर्चना सोनावणे यांनी स्वागत केले. रवींद्र साळेगावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading