Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांच्या आठवणींना मिळाला उजाळा

पुणे : एकदा कादंबरी लिहून पूर्ण झाली की ती दिग्दर्शकाच्या हाती सोपवून मोकळे होणारे जयवंत दळवी, कायमच योग्य पेहराव केलेले जयवंत दळवी, तालीमींना येऊन एकही सूचना न करता एका कोपऱ्यात बसणारे दळवी, आणि नाटकातील व्यक्तीरेखा ही कथावस्तू होऊ शकते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. निमीत्त होते पुण्यातील बेलवलकर सांस्कृतिक मंच व संभाषा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘दळवी समजून घेताना’ या कार्यक्रमाचे.

नवी पेठेतील एस एम जोशी सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन ऑगस्ट महिन्यापासून सुरु होत असलेल्या दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री नीना कुळकर्णी, नाटककार प्रशांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, दळवी यांच्यावर पीएचडी केलेल्या डॉ. मानसी मागीकर व समीर बेलवलकर आदी मान्यवरांनी दळवी यांच्या व्यक्तीमत्त्वावर प्रकाश टाकला. राजेश दामले यांनी नीना कुळकर्णी यांच्याशी प्रश्न्नोतरांच्या माध्यमातून संवाद साधला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी ‘ऐसी अक्षरे’च्या जयवंत दळवी यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

विजयाबाई मेहता दिग्दर्शित आणि जयवंत दळवी लिखित नाटकांमध्ये काम करायची संधी मला मिळाली यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजते. त्यांच्या ‘गुंतता हृदय हे’ या नाटकात मी एसएससीच्या परीक्षेनंतर ते बीएच्या परीक्षेपर्यंत असे प्रदीर्घ काळ काम केले असे सांगत नीना कुळकर्णी म्हणाल्या, “गुंतता हृद्य हे या नाटकाद्वारे माझ्या नाट्यशास्त्राच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तोवर माझा मराठी साहित्याशी संबंध नव्हता. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्याने आधी इंग्रजी साहित्य वाचण्यावर माझा भर होता. परंतु, जयवंत दळवी यांच्यामुळे माझा मराठी साहित्याशी खऱ्या अर्थाने संबंध आला.”

दळवी यांची नाटके लांबलचक आहेत आणि संवाद तुटक आहेत असे मला सुरुवातीला वाटायचे. मात्र नाटकाचे प्रयोग जसजसे होत गेले तसतसे लेखकाने नटांना भरता यावी म्हणून दोन वाक्यांमध्ये जागा सोडल्याचे माझ्या लक्षात आले. त्यांच्या नाटकात भूमिका करता करता मला व्यक्तिरेखेतील तीव्रता शोधण्याची सवय लागली. इतकेच नव्हे तर दळवींच्या नाटकामुळे व्यक्तिरेखेचा विचार करायची क्षमता माझ्यासारख्या नवोदित कलाकारामध्ये निर्माण झाली, असेही कुळकर्णी म्हणाल्या.

जयवंत दळवी यांचे घारे डोळे अतिशय भेदक होते. ते तालीमींना आले की त्या भेदक डोळ्यांनी सगळीकडे पहायचे. दळवी हे कायमच योग्य पेहरावात अर्थात वेल ड्रेस्ड असायचे. विजयाबाई आणि जयवंत दळवी यांनी अनेक नाटके एकत्र केली. या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता होती म्हणून त्यांनी एकत्र केलेली सर्वच नाटके उत्तम व्हायची. ‘सावित्री’ नाटकावेळी त्या दोघांमध्ये मतभेद झाले होते, असे आम्हाला जाणवायचे मात्र, हे मतभेद त्या दोघांनीही कधीही आमच्यासमोर आणले नाहीत, अशा आठवणी देखील कुळकर्णी यांनी सांगितल्या.

दळवी यांच्या अनेक कादंबऱ्यांची पुढे नाटके झाली, कला क्षेत्र हे अनेक शक्यतांचे जग आहे आणि या शक्यतांचे संपूर्ण ताट दळवी यांनी सर्वांसमोर वाढून ठेवले होते. ‘चंपू’ ही मी साकारलेली व्यक्तीरेखा जयवंत दळवी यांच्या आवडीची व्यक्तीरेखा होती. नाट्यशाळेत न जाता काम करता करता शं ना नवरे आणि दळवी यांसारख्या नाटककारांमुळे आम्हा कलाकारांना खूप काही शिकण्याची संधी मिळाली, असे नीना कुळकर्णी यांनी सांगितले.

साहित्य क्षेत्रातील व्यक्ती नाटकांकडे आकृष्ट होते या प्रकारातील नाटककार म्हणजे जयवंत दळवी आहेत. ते मला आधी साहित्यिक मग नाटककार वाटतात. अनेक साहित्यिक नाटककार होण्याच्या फंदात पडत नाहीत, मात्र दळवी यांना नाटकाचे तंत्र, त्याची अंतर्भूत रचना उमगली होती. त्यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये नाटक होण्याची क्षमता, नाट्यमयता, व्यक्तीरेखेचा विकास आणि वेगळेपण आहे, असे प्रशांत दळवी यांनी नमूद केले.

व्यक्तीरेखा ही कथावस्तू कशी बनू शकते, हे जयवंत दळवी यांनी सिद्ध करून दाखविले. आजही त्यांच्या नाटकातील व्यक्तिरेखा तुम्हाला आठवतील. कारण त्यांनी या व्यक्तीरेखा सजीव केल्या, जिवंत केल्या, बहुरंगी केल्या. त्यांच्या व्यक्तीरेखांमध्ये एक खोलपणा होता या व्यक्तीरेखा मराठी रंगभूमीला मिळालेल्या देणग्या आहेत, असे मला वाटते. त्यांच्याशिवाय मला मराठी रंगभूमी अधुरी वाटते असे सांगत प्रशांत दळवी म्हणाले, “जयवंत दळवी यांनी मध्यमवर्गीयांकडे संवेदनेने कधीही पाहिले नाही. त्यांनी मध्यवर्ग, कनिष्ठ मध्यम वर्ग यांची सुख-दु:ख, राग-लोभ, वासना-विकार, आचार-विचार, त्यांच्या दबलेल्या भावना, त्यांच्या स्तरातून त्यांची बाहेर पडण्याची धडपड आपल्या लिखाणामधून मांडली.”

प्रांजळपणा आणि पारदर्शकता यांचे दर्शन जयवंत दळवी यांच्या व्यक्तीमत्त्वातून व्हायचे. समोरच्या व्यक्तीचा आदर ठेवत टीका कशी करावी, हे दळवी यांच्याकडून शिकायला हवे. प्रसन्न आणि मार्मिक विनोद हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य होते. त्यांनी कधी आत्मचरित्र लिहिले नाही परंतु त्यांच्या लिखाणातून त्यांच्या जीवनातील अनेक चित्रे दिसतात. खरखुरं आत्मचरित्र लिहिण्याचे धैर्य नसेल तर लिहू नये आणि तसं धैर्य माझ्याकडे नाही असे दळवी म्हणत, असे  कुवळेकर यांनी सांगितले.

जयवंत दळवी यांना माणूस, माणसाच्या लैंगिक भावना तसेच वेडी माणसं व त्यांचे वर्तन यांबद्दल कुतूहल होते. कामानिमित्त मुंबईत स्थायिक झाले तरी कोकणातील आपल्या आरवली या जन्मभूमीचे प्रेम कायमच त्यांच्या मनात होते. राष्ट्रसेवा दलासाठी त्यांनी प्रासंगिक लेखन केलं. परंतु त्यानंतर त्यांनी प्रचार पद्धतीचे लेखन कधी केले नाही. गर्दीपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणारे दळवी प्रवास करताना मात्र हमखास बसनेच प्रवास करत असत आणि गर्दीचे आणि गर्दीतील माणसांचे निरीक्षण करत असत असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू कुवळेकर यांनी उपस्थितांपुढे उलगडून दाखवले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संभाषा फाउंडेशन प्रस्तुत ‘स्त्रीपर्व’ हा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये जयवंत दळवी यांच्या गाजलेल्या नाटकांतील स्त्री व्यक्तिरेखांवर आधारित नाट्यप्रवेशांचे अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना डॉ मानसी मागीकर यांची होती. विनीता पिंपळखरे, अमित त्रिभुवन आणि डॉ मानसी मागीकर या कलाकारांनी त्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर बेलवलकर यांनी केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले तर शांतिनी सुतार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading