पॅन्डॅमिक काळावर चितारलेल्या चित्रांचे प्रदर्शन २५ ऑगस्ट पर्यंत
पुणे : साल २०२० च्या सुरुवातीला कोविड १९ विषाणूने संपूर्ण जगाला हादरवून सोडले. पुढील किमान २ वर्षे संपूर्ण जग शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर या विषाणूचा सामना करत होते. या काळात विस्कळीत झालेले जनजीवन, अनेकांवर ओढावलेली परिस्थिती, आलेला एकाकीपण, जीवलग-कुटुंबीय यांपासून झालेली ताटातूट अशा संमिश्र भावनांची मांडणी असलेले ‘वन्स अपॉन अ टाईम, अ पॅन्डॅमिक’ हे चित्रप्रदर्शन २५ ऑगस्ट पर्यंत पुण्यात सुरु आहे. कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम या ठिकाणी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून सर्व दिवस सकाळी ११ ते सायं ७.३० दरम्यान ते रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

मोनालिसा कलाग्राम आणि आयजीए गॅलेरिया यांच्या वतीने आयोजित या प्रदर्शनात युवा चित्रकार चितकला रमेश यांची अॅक्रलिक माध्यमातील चित्रे रसिकांना पाहता येणार आहेत. पॅन्डॅमिक काळावर चितारलेली ही चित्रे आकाराने मोठी असून हे या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. ज्येष्ठ कला लेखक, छायाचित्रकार म्हणून सर्वपरिचित असलेल्या गिरीधर खासनीस यांनी ही प्रदर्शन क्युरेट केले आहे हे विशेष.
टाळेबंदी आणि विलगीकरणाच्या काळात जगण्याचे वास्तव सांगणारे हे प्रदर्शन म्हणजे जणू एक कथा असून याद्वारे चित्रकार चितकला रमेश यांनी मार्मिक मांडणी आहे. या प्रदर्शनातील चित्रे ही एकाकीपणाच्या वेदनादायक काळाचे द्योतक असून त्या काळातील आपल्या प्रत्येकाच्या सुखद, दु:खद आणि आशावादी भावभावनांचे चित्रण या चित्रांमधून दिसून येते असे म्हणता येईल.
चितकला रमेश या बंगळुरुस्थित व्हिज्युअल आर्टिस्ट, डिझायनर असून कर्नाटक चित्रकला परिषद (सीकेपी) आणि बंगळुरु येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन (एनआयडी) या संस्थांच्या माजी विद्यार्थीनी आहेत. पुण्यामधील हे त्यांचे पहिलेच प्रदर्शन आहे.
