विनापरवानगी झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड
मुंबई : विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड वसूल करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
मागील काही वर्षांपासून सार्वजनिक जागेवर असलेली अनेक झाडे तोंडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन देखील त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजार दंड आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दंडाशिवाय अशारितीने तोडलेले कोणतेही झाड आणि ते वाहून नेण्यासाठी वापरलेली हत्त्यारे, नौका, वाहने सरकारजमा करण्यात येतील. या संदर्भातील दुरुस्ती महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 मधील कलम 4 मध्ये करण्यात येऊन अध्यादेश मांडण्यात येईल.
