Thursday, September 24, 2026
BusinessLatest News

महिलांनो.., बांधकाम क्षेत्रातील बदलत्या आव्हानांना सामोरे जा – जी. राम रेड्डी

पुणे : पारंपारिक बांधकाम व्यवसाय पद्धतीत आता अमुलाग्र बदल झाले असून बदलते कायदे, नियम, अधिनियम, योजना, पुनर्विकास प्रकल्प, करप्रणाली, डिजिटलायझेशन, एआय तंत्रज्ञान आदी अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घटकांचा आपल्या क्षेत्रावर थेट परिणाम होत आहे. त्यामुळे कायम अद्ययावत आणि सतर्क राहून बदलत्या आव्हानांना सामोरे जायला हवे, असे प्रतिपादन क्रेडाई नॅशनलचे सचिव जी. राम रेड्डी येथे केले.

क्रेडाई महाराष्ट्रच्या महिला विभागातर्फे फेमिकॉन २.० ही परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या परिषदेत संपूर्ण महाराष्ट्रातील १५० हून अधिक महिला विकसिकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रमोद खैरनार पाटील यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली तसेच महिला विभागाच्या संयोजिका श्वेता भारतीय यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे ही दोनदिवसीय परिषद यशस्वीरित्या पार पाडली.

‘महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर असून बांधकाम क्षेत्र देखील यास अपवाद नाही. पुरुषांची मक्तेदारी असा दृष्टिकोन असणाऱ्या या क्षेत्रात आज महिला सक्षमपणे स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. क्रेडाई महाराष्ट्रसारख्या व्यापक व्यासपीठाच्या माध्यमातून एकत्रित येऊन परिषद भरवत आहेत, ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे,’ अशा शब्दांत खैरनार पाटील यांनी उद्योजिकांचे कौतुक केले.

क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष तसेच रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अकादमी समिती अध्यक्ष अनंत राजेगावकर, क्रेडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, विद्यानंद बेडेकर, मानद सचिव तसेच युथविंग अध्यक्ष गौरव ठक्कर, क्रेडाई नॅशनलच्या युथविंग आणि महिला विंगच्या संयोजिका रूपा शहा आदी पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. रिअल इस्टेट, राजकारण, मीडिया, मार्केटिंग, वित्त आणि रिअल इस्टेटच्या सध्याच्या ट्रेंड आधी चौफेर विषयांवर या परिषदेतून सखोल चर्चा झाली.

देवल सोपारकर आणि पल्लवी मतकरी-रुनवाल या दोन उमद्या महिला विकसकांनी फेमिकॉनची सुरुवात केली. त्यांनी बांधकाम क्षेत्रातील महिलांसाठी असलेल्या संधींवर भाष्य केले. आमदार माधुरी मिसाळ तसेच SMEF’s ब्रिक ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या संस्थापिका पूजा मिसाळ यांनी सर्व वर्गांमध्ये, विशेषत: महिलांसाठी शिक्षण आणि कौशल्याचे महत्त्व सांगितले. महिला व बालकल्याण अधिकारी आर. विमला यांनी प्रशासकीय अधिकारी होण्यापूर्वी व त्यानंतरचा आपला प्रवास उलगडला. तसेच महिला उद्योजकांसाठीच्या असलेली धोरणे, योजना यासंबंधी मार्गदर्शन केले. युथ विंगच्या सदस्य सविता अग्रवाल यांनी डॉक्टर ते विकसक असा आपला अनोखा अनुभव व्यक्त केला. वॉटरफिल्ड ॲडव्हायझर्स च्या संचालिका नीता शिवदासानी, स्पेअर्सचे संचालक मुरली कृष्णन, ट्राइन होल्डिंग्सच्या संचालिका सारा जेकब, यांनी गुंतवणुकींच्या संधींबाबत चर्चा केली.
श्रुती पाटील यांनी AI चे महत्त्व याबद्दल अतिशय तपशीलवार सादरीकरण केले.

दीपा पटारे यांच्या नियोजनातून यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उद्योजिकांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ दीपाली गांधी, मीनाक्षी झमतानी, श्रद्धा मंत्री, सपना राठी यांना बांधकाम क्षेत्रातील व संघटनेसाठी केलेल्या कार्याबद्दल विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. नामांकित बांधकाम व्यावसायिक उज्वला हावरे, वास्तुविशारद राखी टकले व संगीता धायगुडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रोथचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री सुमित मुदिराज यांनी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, जाहिरात प्लेसमेंटचे महत्त्व याविषयी माहिती दिली. अर्चना पेखले, प्रणिती मुनोत, अदिती सिरसीकर, सपना मिरजकर, नेहा खापरे, डॉ. सविता अग्रवाल, ज्योती ठक्कर, सोनल पोखर्ण, दीपा पटारे, ऋचा नावंदर, अपूर्वा सिरसीकर, वृषाली महाजन, सोनाली बागड, मीनाक्षी जमतानी, रेणू गोयल, कांचन बांबल, वैशाली चौधरी सुवर्णा यादव यांच्या नियोजनातून ही महिला परिषद पार पडली. विविधांगी विषयावर झालेल्या चर्चेमुळे महिला बांधकाम व्यवसायिकांसाठी ही परिषद फलदायी ठरली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading