नशिल्या आणि निधर्मी दहशतवादाचा नवा ‘पाक’ डाव
पाकिस्तानने भारतापासून वेगळे झाल्यापासूनच भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. प्रत्यक्ष युद्धात भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर, किंवा खरे तर त्याच्या आधीपासूनच सण 1950 पासून पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये धार्मिक कट्टरतावाद आणि त्याच्या बरोबरीने येणारा जिहादी दहशतवाद रुजवण्यास सुरुवात केली. त्या प्रयत्नात पाकिस्तान बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचेही बऱ्याच प्रमाणात बघायला मिळाले.
मात्र, नव्या काळातील युवकांची आणि एकूण जगाची बदलती मानसिकता व दहशतवाद फैलावण्यासाठी उपलब्ध झालेली नवी साधने याचा विचार करून पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये जिहादी दहशतवादाचा मार्ग सोडून अमली पदार्थांची तस्करी आणि मानवी हक्कांच्या बुरख्याचा वापर करून नवा दहशतवाद रुजविण्यासाठी जाळे टाकले आहे. एकीकडे भारतातील जनता नव्या काश्मीरकडे मोठ्या अपेक्षेने डोळे लावून असताना याच नव्या काश्मीरला नव्या दहशतवादाचे नवे आव्हान पेलावे लागणार आहे.
जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद रुजवण्याचे काम पाकिस्तान सन 1950 पासून करीत आहे. धर्मांधतेने काश्मिरी युवकांची माथी भडकवायची. त्यांना अंदाजून दगडफेक करायला लावायची. त्यातल्या निवडक कट्टर तरुणांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये नेऊन पाक गुप्तहेर यंत्रणा आयएसआय आणि लष्कराच्या मार्फत शस्त्र चालवण्याचे आणि बॉम्ब बनवण्याची प्रशिक्षण द्यायचे आणि त्यांच्याकडून जम्मू कश्मीरमध्ये दहशतवादी कृत्य करून घ्यायची, ही कार्यपद्धती पाकिस्तानी दीर्घकाळ अवलंबली.
मात्र, वाऱ्याची बदलती दिशा पाहून पाकिस्ताननेही आता आपली दिशा बदलली आहे. भारतात दहशतवादाचा फैलाव करायचा हे उद्दिष्ट कायम आहे. मात्र, मार्ग बदलले आहेत. पहिला हुकमी, प्रयोगाने सिद्ध झालेला मार्ग म्हणजे नशीला दहशतवाद! सीमेपलीकडून अमली पदार्थ पुरवून पाकिस्तानने पंजाबसारख्या समृद्ध प्रांताचा ‘उडता पंजाब’ करून टाकला. नशील्या दहशतवादाचा फायदा दुहेरी आहे. एकतर युवकांना आधी नशेच्या जाळ्यात ओढायचे आणि दहशतवादाच्या जाळ्यात गुरफटून टाकायचे ही बाब सोपी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या निमित्ताने बनलेल्या टोळक यांचा वापर करून अमली पदार्थांची तस्करी करायची. त्याद्वारे अमाप पैसा उत्पन्न करायचा आणि त्याच पैशातून दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा करायचा. खलिस्तानवादी दहशतवाद्यांना पोसण्यासाठी पाकिस्तानने सध्या याच मार्गाचा अवलंब केला आहे.
दुसरा एक नवीन प्रयोग पाकिस्तानने जम्मू काश्मीर मध्ये सुरू केला आहे. कट्टर धार्मिकतावादाला जगभरात विशेषतः युवा पिढीकडून प्रतिसाद मिळणे कमी झाल्यामुळे पाकिस्तानने आता जम्मू काश्मीरमध्ये निधर्मीवाद आणि मानवी हक्क यांचा बुरखा पांघरलेला दहशतवाद रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी आयएसआयने लष्कर ए तैय्यबा आणि जैश ए मोहम्मद या कट्टर धार्मिक दहशतवादी संघटनांच्या पोटात अँटी फासिस्ट फ्रंट आणि रेजिस्टन्स फ्रंट अशा निधर्मी आणि अन्यायाला विरोध करणाऱ्या वाटतील अशा नावाच्या संघटना उभ्या केल्या आहेत. या संघटनांमार्फत काश्मीरमध्ये पुन्हा शिरकाव करायचा. दहशतवादी कारवाया घडवून अशांतता निर्माण करायची. काश्मीरमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली होत असल्याची वातावरण निर्मिती करून जगभरात भारताला बदनाम करायचे आणि स्थानिक युवकांमध्ये असंतोष निर्माण करायचा, असा पाकिस्तानचा डाव आहे.
काश्मीरमध्ये पुन्हा पाय रोवण्यासाठी आयएसआयने ‘बॉर्डर ॲक्शन टीम’ ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली आहे. एका बॉर्डर ॲक्शन टीममध्ये पाक लष्करातील दोन ते चार कमांडोंचा समावेश असतो तर त्यांच्याबरोबर सहा ते आठ प्रशिक्षित दहशतवादी दिले जातात. हे दहशतवादी देखील कुठेतरी बॉम्ब पेरणारे किंवा अंदाधुंद गोळीबार करणारे माथेफिरू नसतात. त्यांची बॉर्डर ॲक्शन टीमसाठी निवड केल्यानंतर त्यांना पाक लष्कर आठ महिने तर वायुदल चार महिने प्रशिक्षण देऊन तयार करते. ही बॉर्डर ॲक्शन टीम नियंत्रण रेषेवर फिरवून कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराची संख्या कमी आहे, भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन कोणत्या ठिकाणाहून घुसखोरी करणे शक्य आहे, याची पाहणी करते. त्यानुसार लष्करी कमांडो आणि दहशतवादी घुसखोरीचे नियोजन करतात. अशाच पद्धतीने नियोजन करून सध्या भारतीय हद्दीत घुसलेले बहुसंख्य दहशतवादी हे प्रामुख्याने पीर पांजाल या जम्मूला खेटून असलेल्या काश्मीरच्या टोकाच्या परिसरातून भारतात घुसवण्यात आले आहेत. या ठिकाणी नियंत्रण रेषेवर कुंपण घालण्यास मर्यादा आहेत. या भागात अनेक नाले आणि खाच खळगे आहेत. ज्यातून लपत छपत, रांगत, सरपटत दहशतवादी सीमारेषा पार करतात.
यापुढील काही महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणे अपेक्षित आहे. या निवडणुका शांततेत होऊ द्यायच्या नाहीत. निवडणुकीपूर्वी जम्मू काश्मीरच्या जनतेमध्ये भारताबाबत अविश्वास निर्माण करायचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील भारत काश्मीरवर अन्याय करत असल्याचे ठळकपणे ठसवायचे, असे पाकिस्तानचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांना पुन्हा वेग देण्यात आला आहे. या काळात स्थानिक जनतेकडून दहशतवाद्यांना मदत होण्याऐवजी लष्कर आणि त्यांच्यात सामंजस्य कसे निर्माण होईल या दृष्टीने प्रयत्न करणे, पीर पांजाल सारख्या भागात नियंत्रण रेषेवर कुंपण उभारणे, मानवी गुप्तहेर यंत्रणा (human intelligence) अधिक सक्षम करून दहशतवादी गटांच्या कारवायांवर बारीक नजर ठेवणे आणि त्यांना स्थानिकांमध्ये शिरकाव करू न देणे या उपायोजना करणे आवश्यक आहे.
