इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव -खासदार संजय राऊत
मुंबई: प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. त्यासाठी परदेशात कट रचला जात आहे. पुढच्या काही काळात आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
… तरीही असंवैधानिक काम करणे सोडले नाही
राहुल गांधी मागील काही काळापासून आक्रमकपणे सरकारला आरसा दाखविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधकांची त्यासाठी तयारी आहे. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अल्पमतात आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी असंवैधानिक कामे करण्याचे सोडले नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे. इंडिया आघाडीने सत्ताधाऱ्यांना पिछाडीवर टाकले आहे. त्यामुळे भाडोत्री गुंडांकडून आमच्यावर हल्ले होऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.
लाडक्या बहिणींचा उमाळा दोन महिन्यांसाठीच
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना लाडक्या बहिणींचा उमाळा आला आहे. मात्र, हाव मला दोन महिन्या पुरताच असणार आहे. दोन महिने कसे तरी पैसे देतील आणि त्यानंतर हे तिघेही पळून जातील. त्यानंतर लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीलाच घ्यावी लागणार आहे, असेही राऊत म्हणाले.
धनुष्यबाण चोरांच्या हातात असला तरी…
धनुष्यबाण सध्या चोरांच्या हातात असला तरीही बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार कामगिरी करत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मशालीने अनेक जागांवर भाजपच्या खुर्चीला आग लावली आहे, असेही राऊत म्हणाले.
