NEET : सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा परीक्षेची मागणी फेटाळली
नवी दिल्ली: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण देशव्यापी नव्हते. त्याची व्याप्ती मर्यादित होती, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा परीक्षेची मागणी फेटाळली आहे. मात्र, यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा प्रक्रियेवर करडी नजर ठेवण्यासाठी कार्यपद्धती विकसित करण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्यात आले आहेत.
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण केवळ पाटणा आणि हजारीबाग एवढेच मर्यादित आहे. देशभरात नियोजनबद्ध रीतीने पेपरफुटी घडवून आणल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही पुर्नपरीक्षेची मागणी फेटाळत आहोत, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, राष्ट्रीय परीक्षण संस्थेने (एनटीए) यापुढे काळजी घेणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने सुनावले.
परीक्षा प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या सायबर तंत्रज्ञानातील त्रुटी शोधून अधिक सक्षम व सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करण्याची आवश्यकता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून परीक्षा संपेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर नजर आणि नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचे आदेशही त्यांनी केंद्र सरकारला दिले आहेत. परीक्षा पद्धतीतील कच्चे दुवे शोधून ते दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीने आपला अहवाल 30 सप्टेंबर पर्यंत सादर करावा असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले.
