पुण्यातील पुरंपरिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार – राज ठाकरे
मुंबई: विकासाच्या वेगवेगळ्या योजना आणणाऱ्या राज्य सरकारचे शहर नियोजनाकडे साफ दुर्लक्ष होत आहे. शहर नियोजन ही राज्य सरकारचा संबंधित विभाग आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरे बकाल होत आहेत, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पुण्याला फार वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पुण्यात उद्भवलेल्या पुरस्थितीचा ठाकरे यांनी आढावा घेतला. पूरग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवादही साधला. धरणातून पाणी सोडताना नदीच्या आसपासच्या नागरिकांना खूप आधी पूर्वकल्पना देणे गरजेचे आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.
दिसली जागा की विक…
शहराचे नियोजन करताना लोकसंख्येनुसार काय सुविधा देणे आवश्यक आहे, याचा विचारच केला जात नाही. शहरात किती गाड्या येतात, त्यांना पार्किंग करायला जागा आहे का, याचा कसलाच विचार केला जात नाही. शहरात रुग्णालय, बागा, उद्याने अशा सुविधाही आवश्यक असतात. याचा विचार न करता सध्या दिसली जागा की विक असा एकमेव धंदा सुरू आहे, अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
शहरांची जबाबदारी घेणार कोण?
सध्या पुण्यात एकाच शहरात पाच शहर वसलेली आहेत. पुण्याची वाट झपाट्याने होत गेली. वाढीचा हा वेग अद्भुत आणि विचित्र आहे. सरकारने मागील दोन-तीन वर्षात महापालिकेच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. नगरसेवकच नसतील तर शहराची जबाबदारी घेणार कोण? शहरातील कामांबाबत प्रशासनाला जाब विचारणार कोण, असा सवालही ठाकरे यांनी केला.
बाहेरून येणाऱ्यांना फुकट घर…
मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात परराज्यातून येणाऱ्यांना फुकट घरे मिळतात आणि जो या राज्याचा खरा मालक आहे, ज्याने कष्टाचा पैसा खर्च करून घर उभारले आहे त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जात आहे. इथल्या शाळा महाविद्यालयात परराज्यातून येणाऱ्यांना प्रवेश दिले जातात आणि स्थानिक मुले प्रवेशासाठी आरक्षण मागत आहेत. राज्य म्हणून महाराष्ट्राचा विचार कोणी करणार आहे की नाही?
