Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

विदुषी शमा भाटे यांनी विलोभनीय पदन्यासातून खुलवेले नृत्याचे सौंदर्य

पुणे : प्राचीन काळापासून नृत्य कला जोपासली गेली आहे. त्यात मुख्यत्वे करून आराधना भाव आणि स्तुती केली जाते. कथक म्हणजे कथा सांगणे. ही नृत्यपरंपरा अक्षुण्ण नाही. काळानुरूप या परंपरेत बदल होत गेले. मागचा धागा पकडून ठेवत नाविन्याची भर घालणे हे नृत्य परंपरेत दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी केले. पंडित बिरजूमहाराज यांनी नृत्य रसिकाभिमुख, समृद्ध केले. त्यांनी कथक नृत्यप्रकारात गिनती आणली, ती पुढे कथक नृत्याचा अविभाज्य भाग झाली अशी वैशिष्ट्ये सांगून शमाताई यांनी विलोभनीय पदन्यास, हावभाव यातून नृत्याचे सौंदर्य खुलविले.

गानवर्धन आणि व्हायोलिन अकादमीच्या स्वरझंकार ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त संगीत चर्चासत्रातील दुसरे पुष्प आज (दि. 27) ज्येष्ठ नृत्यगुरू विदुषी शमा भाटे यांनी ‌‘कथक नृत्य परंपरा‌’ या विषयावर गुंफले. त्या वेळी त्यांनी सप्रात्यक्षित कथक नृत्य परंपरेविषयी मार्गदर्शन केले. एमआयटी कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे प्राचार्य शारंगधर साठे, गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर, स्वरझंकार ज्ञानपीठाचे प्रमुख, प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये, राजश्री महाजनी मंचावर होते.

गानवर्धन संस्थेतर्फे नवोन्मेष कथक नृत्य युवा पुरस्काराने रेणुका टिकारे केळकर यांचा तर शास्त्रीय संगीतामधील नवोन्मेष संगतकार पुरस्काराने तबला आणि सारंगीवादक मंदार बगाडे यांचा आज गौरव करण्यात आला. पुरस्कार वितरण विदुषी शमा भाटे आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते झाले. सन्मानचिन्ह, दहा हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार ज्येष्ठ कथक नृत्यगुरू डॉ. सुजाता नातू यांनी पुरस्कृत केले आहेत.

युवा कलाकारांचे सांस्कृतिक प्रबोधन व्हावे, कलांविषयी माहिती व्हावी या उद्देशाने मुक्त संगीत चर्चासत्र हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे दयानंद घोटकर यांनी प्रास्ताविकात नमूद केले. विदुषी रोहिणी भाटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने ‌‘कथक नृत्य परंपरा‌’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या काळातील प्रेक्षकांना जोडताना कथक नृत्याची परंपरा जपत त्यात नाविन्याची भर घातली जात आहे. आजचे कथक नृत्य पूर्ण उमलेल्या फुलासारखे वाटते आणि दर दशकात काही तरी वेगळेपण घेऊन येते असे सांगून शमा भाटे यांनी सुमोर दिडशे वर्षांचा कथक नृत्याचा इतिहास उलगडून दाखविला.

शिववंदना, थाट, आमद, नटवरी, परमेलू, गत भाव, गत निकास, तलवार गत, नथनी गत, नृत्त हे प्रकार अमिरा पाटणकर, अवनी गद्रे, श्रद्धा मुखडे, श्रेया कुलकर्णी, प्रचिती भावे आणि प्रमोद वाघ यांनी सादर केले. आशय कुलकर्णी यांनी तबलासाथ केली.

पंडित अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी यांनी दाखविलेल्या मार्गावर संस्था वाटचाल करीत आहे. त्यांची कलेच्या क्षेत्रातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व्हायोलिन अकादमीचे स्वरझंकार ज्ञानपीठ सर्वातोपरी सहकार्य करेल. विदुषी रोहिणी भाटे यांचे व्यक्तिमत्त्व ऋषितुल्य होते. महाराष्ट्रात कथक नृत्याचा प्रचार व प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रोहिणीताईंचे कार्य शमाताई ताकदीने पुढे नेत आहेत, असेही ते म्हणाले

मान्यवरांचा सत्कार दयानंद घोटकर आणि राजश्री महाजनी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभा वांबुरकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading