Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार   

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, सिद्धहस्त लेखिका व राज्यसभेच्या सदस्या सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसेच साहित्य व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. लोकमान्यांच्या चतु:सूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने त्यांनी मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण विकास, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी सुधा मूर्ती यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी आज पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. लोकमान्य टिळक यांची गुरूवार दि. १ ऑगस्ट रोजी १०४ वी पुण्यतिथी आहे. या निमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सायंकाळी ६ वाजता होणार्‍या सोहळ्यात सुधा मूर्ती यांना पुरस्काराने गौरविले जाणार आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार, खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक यांच्या सह ट्रस्टचे अन्य विश्‍वस्त यावेळी उपस्थित असतील. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे यंदाचे ४२ वे वर्ष आहे. स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

याच सोहळ्यात टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्‍वस्त डॉ. प्रणति रोहित टिळक यांनी लिहिलेल्या ‘लिजेंडरी लोकमान्य’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होईल. लोकमान्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना आणि दुर्मिळ छायाचित्रे याचा समावेश या कॉफीटेबल बुकमध्ये आहे.  

देशहितासाठी नि:स्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना १९८३ पासून या पुरस्काराने गौरविण्यात येते. आतापर्यंत एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम.एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही लोकमान्यांची चतु:सूत्री आजही तितकीच महत्त्वाची आहे, असे नमूद करून डॉ. रोहित टिळक म्हणाले, ”इन्फोसिस फाऊंडेशन या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेच्या निर्मितीमध्ये सुधा मूर्ती यांचा सक्रिय सहभाग आहे. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य देशाच्या विकासाला चालना देणारे ठरले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान देखील समाजात जागृती करणारे ठरले. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळुरू शहर व परिसरात त्यांनी सुमारे 10,000 स्वच्छतागृहे संस्थेच्या माध्यमातून उभारली. तामिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील रहिवाशांनाही संस्थेने मदत दिलेली असल्याचे,” डॉ. टिळक यांनी नमूद केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading