Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

त्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत : मनोज जरांगे पाटील

जालना:  मराठा आरक्षणाबाबत तब्बल 70 वर्षापासून समाजाची दिशाभूल केली जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे दोघे मिळून समाजाला उल्लू बनवत आहेत, असा आरोप करीत, समाजाने केवळ नेत्यांची हमाली करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे का, असा सवाल मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून काही काम होत नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आपला मुक्काम हलवला आहे. ते या ठिकाणी आपल्या प्रकृतीवर उपचार करून घेणार आहे. त्यानंतर समाजातील विविध घटकांशी संपर्क साधून आरक्षणासंबंधी काम सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आरक्षण मिळू नये हा राजकीय नेत्यांचा डाव 

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हा सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच राजकीय नेत्यांचा डाव आहे. मराठा समाज मोठा व्हावा ही त्यांची इच्छा नाही. समाजाने केवळ नेत्यांच्या मागे फिरावे, हीच त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत समाजाची केवळ दिशाभूल केली जात आहे, असा आरोप जरांगे पाटील यांनी सर्वच पक्षांच्या राजकीय नेत्यांवर केला. 

समाजात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र 

सरकार आणि आंदोलन यांच्यात काय बोलणे झाले ते आम्हाला माहित नाही असे विरोधक म्हणतात. इथे सर्व काही उघड आहे. तरीही आम्हाला माहित नाही म्हणत आपली भूमिका स्पष्ट न करणे, यामागे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचेही समाजात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. सत्ताधारी आणि विरोधक इतर अनेक कारणांसाठी अनेकदा एकत्र येतात. मात्र, आरक्षणावर बोलण्यासाठी त्यांना एकत्र येता येत नाही. राजकीय नेत्यांनी मनात आणले तर ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात. मात्र, केवळ समाजाला झुलवत ठेवणे एवढेच राजकारणाचे धोरण आहे, अशी टीकाही जरांगे पाटील यांनी केली. 

… तर पाडापाडी करण्याला पर्याय नाही 

जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार नसाल तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळवून देणार नाही. आमचा जीव आरक्षणात आहे आणि राजकारण्यांचा जीव खुर्चीत आहे. आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर आम्ही तुम्हाला खुर्ची मिळू देणार नाही. आरक्षण हे आमचे अंतिम उद्दिष्ट आहे. ते साध्य होत नसेल तर पाडापाडी करण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय उपलब्ध नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी राजकीय नेत्यांना दिला. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading