पुण्यात सराईत गुन्हेगाराचा तिघांकडून निर्घुण खून!!!
पुणे – येरवड्यात पूर्ववैमन्यास्यातून एका सराईत गुन्हेगाराचा एकाच कुटूंबातील तिघांनी तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. सुधीर चंद्रकांत उर्फ बाळू गवस (वय 25, रा. जयप्रकाश नगर येरवडा ) या सराईत गुन्हेगाराचा खून झाला असून याप्रकरणी आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य (वय 44), स्वप्निल प्रवीण आचार्य (वय 28) तसेच रवी किरण रामचंद्र आचार्य (वय 35, तिघेही रा. जयप्रका नगर, येरवडा ) यांना अटक करण्यात आली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर गवस याचे आचार्य कुटुंबासोबत पूर्वीचे वाद होते. गवस याच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल होते. काही दिवसापूर्वीच तो जेल मधून सुटला होता. मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणे झाली. आचार्य कुटुंबीयांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरु केला. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मयत सुहास हा आकाश मिनी मार्केट दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसलेला असताना त्याला गाठून तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात व शरीरावर तीक्ष्ण वार केले. या हल्ल्यात सुधीर याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी येरवडा पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली. मयत सुधीर गवस याचा मृतदेह शव विच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला असून या निर्घुण खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम येरवडा पोलीस करीत आहेत.
