Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

भारतीय संस्कृती परिवर्तनशील ; इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांचे प्रतिपादन

पुणे : आपल्या संस्कृतीत जेव्हा जेव्हा विचारांना, तत्त्वांना ग्लानी आली, तेव्हा तेव्हा याच संस्कृतीत महान विचारवंत निर्माण होत गेले. या विचारवंतांनी त्या वेळी नवा संदेश दिला आणि समाजानेही तो स्वीकारला. गौतम बुद्ध, भगवान महावीर ही यांतीलच उदाहरणे आहेत. त्यामुळे प्राचीन भारतीय संस्कृती टिकण्यामागे तिचे परिवर्तनशील असणे हे मूळ कारण आहे, असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी केले.

पुण्यातील गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने कर्वे रस्त्यावरील स्वामी कृपा सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव व ज्येष्ठ लेखिका डॉ लीना मेहेंदळे लिखित ‘श्रद्धा, अंधश्रद्धा एवंम राष्ट्रधर्म’ या पुस्तकाचे प्रकाशन पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, पुस्तकाचे सहलेखक योगेश्वर कस्तुरे, कार्यक्रमाच्या समन्वयक शुभदा वर्तक आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ लीना मेहेंदळे या भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासक असून भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा काय आहे, याचे सुंदर विचारमंथन त्यांनी या ग्रंथात केले असल्याचे पांडुरंग बलकवडे म्हणाले.

ते पुढे  म्हणाले की, “ग्रीक, रोमन, शक, हूण, कुशाण, इजिप्तशियन, मेसिपोटेमियन अशा अनेक संस्कृती जगाच्या पाठीवर अस्तित्वात होत्या. मात्र, आज त्या नष्ट झाल्याचे आपण पाहतो. आज ठिकठिकाणी या संस्कृतींचे भलेमोठाले अवशेष केवळ दिसतात पण संस्कृती नष्ट झाल्या आहेत. तेथील समाजाने आपल्या पूर्वजांशी असलेले त्यांचे नाते तोडून दुसऱ्या विचारांशी नाते जोडले आहे, ही परिस्थिती सर्वत्रच आहे. मात्र भारतीय संस्कृतीचे असे झाले नाही. आपल्या समाजाने प्राचीन संस्कृतीशी असलेले आपले नाते टिकवून ठेवले. आपला समाज आजही वेदांचे लेखन करणारे ऋषी- मुनी, भगवान रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे आम्ही वारस आहोत आणि त्यांच्या विचारांवर आमची वाटचाल सुरु आहे असे सांगतो, आणि म्हणूनच आपली संस्कृती ही चिरंतन, अनादी, अनंत, अथांग आणि अद्वितीय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”

आपल्या संस्कृतीत विचार आणि आचार स्वातंत्र्य आहे म्हणूनच नवे विचार जन्माला येऊ शकले आणि रुजू शकले. आपल्याकडे धर्माची व्याख्या व्यापक असून संस्कृती हा त्याचाच प्रचलित अर्थ घेत समाजाने वाटचाल केली आहे. आपला धर्म हा कोण्या एका व्यक्तीने निर्माण केलेला नाही किंवा कोण्या एका ग्रंथात साठवलेला नाही. हजारो वर्षांपासून हजारो ऋषींनी विश्वाचे चिंतन केले आणि त्यांना उलगडलेले महान तत्वज्ञान मांडले. धर्माची निर्मिती कोणा एका ऋषीने केलेली नाही, तर हजारो मुनींचे ज्ञान त्यात आहे आणि हजारो वर्षे ही प्रक्रिया सुरु आहे, असे बलकवडे यांनी सांगितले.

जगभरातील इतर संस्कृती नष्ट झाल्या तरी, आपली प्राचीन भारतीय संस्कृती ही अद्याप टिकली आहे. भारतीय संस्कृती टिकली तरच आपण टिकू असे जग म्हणत असले तरी, त्यांची मानसिकता आणि कृती ही भारतीय संस्कृती मिटविण्याचीच राहिली आहे. त्यामुळे आपली प्राचीन भारतीय संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीयांनीच प्रयत्नशील रहायला हवे. हे करीत असताना आपली संस्कृती आपण पुढे कशी पोहोचविणार आहोत यावर विचार करण्याची गरज आहे, असे डॉ लीना मेहेंदळे यांनी नमूद केले.

आपली संस्कृती काय आहे, याची ओळख भारतभर न्यायची असेल तर हिंदीमध्ये लिखाण करण्याची गरज डॉ मेहेंदळे यांनी अधोरेखित केली. महाभारत आणि ज्ञानेश्वरी यांचा गाभा ही भगवतगीता आहे. ज्ञानेश्वरी महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतभर आणि जगभर जावी यासाठी आपण प्रयत्न करायला हवे आहेत, असेही त्या म्हणाल्या.

आपली ज्ञानेश्वरी देशात सर्वदूर पोहोचविण्यासाठी हिंदी ही भाषा एक मुख्य माध्यम असल्याने प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे हिंदी भाषांतर आपण देशभर पोहोचविण्यासाठी कार्यरत असल्याची माहिती डॉ अशोक कामत यांनी दिली.

पुस्तकाच्या प्रकाशनानंतर डॉ मेहेंदळे यांनी ‘महाभारत, ज्ञानेश्वरी व गीता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने श्रेणिक शहा व लतिका शहा या दाम्पत्याचा आदर्श माता पिता पुरस्कार प्रदान करीत सन्मान करण्यात आला.

पुस्तकाचे सहलेखक योगेश्वर कस्तुरे यांनी सुरुवातीला पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. शुभदा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading