Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

मेंदूविषयक रोगनिदानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक वापर होण्याची शक्यता : डॉ. जयदेव पंचवाघ

पुणे : मेंदूच्या रोगनिदान प्रक्रियेत तसेच मेंदूसंबंधित शस्त्रक्रियांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वाधिक होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी येथे केले. केवळ मेंदूच नव्हे तर आरोग्याशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात सखोल आणि व्यापक संशोधन जगभर सुरू आहे. काळानुरूप कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत तंत्रज्ञानाचा आधार या संशोधनाला आहे, असेही ते म्हणाले.
रोहन प्रकाशनतर्फे रोहन साहित्य मैफलीअंतर्गत भावार्थच्या सहयोगाने आयोजित विशेष कार्यक्रमात डॉ. पंचवाघ लिखित ‌‘न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा : मेंदू आणि मणक्याचे कार्य, आजार व उपचार‌’ या पुस्तकाच्या निमित्ताने प्रसाद मिरासदार यांनी डॉ. पंचवाघ यांच्याशी संवाद साधला.
डॉ. पंचवाघ म्हणाले, मानवाची नर्व्हस सिस्टीम ही अत्यंत गुंतागुंतीची रचना आहे. मानवी बुद्धिमत्ता, विचार, तर्कशक्ती, भावना, कल्पकता, मनाचे सामर्थ्य, आस्वादन या सर्वांचे नियंत्रण करणारी ही रचना आहे. मेंदू, मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) आणि शरीरभर पसरलेले नसांचे जाळे, हा या रचनेचा विस्तार आहे. शरीरातील सर्वांत महत्त्वाचा पण सर्वांत नाजुक आणि संवेदनशील, असा हा भाग आहे. मेंदूचे कुठलेही आजार टाळण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि समन्वयाची गरज असणारे उपक्रम, यांची जोड आवश्यक आहे‌’.
न्यूरोसर्जरीचे शास्त्र शंभर वर्षांपासून प्रगत होत गेले असले तरी गेल्या 15 वर्षांत झालेली या क्षेत्रातील प्रगती आश्चर्यकारक आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूच्या अत्यंत नाजुक आणि कौशल्याच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित झाल्या आहेत. जागरुकतेच्या अभावामुळे थेट शस्त्रक्रियेच्या अवस्थेत रुग्ण सर्जनपर्यंत पोहोचतात. रोगाची लक्षणे, पूर्वसूचना याविषयीचे अज्ञान अधिक दिसते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत केवळ माहिती न पोहोचवता, नेमकी दृष्टी देणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. मणक्याचा स्पाँडिलायसिस व मेंदूचे विकारांवरील उपचारांसंदर्भात या पुस्तकात अतिशय सोप्या भाषेत माहिती देण्यात आली आहे.
भावार्थचे पंकज कुरटे यांनी उपक्रमाविषयी माहिती सांगितली. रोहन प्रकाशनाचे रोहन चंपानेरकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading