Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई – गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा – खासदार नारायण राणे

नवी दिल्ली : चाकरमान्यांचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी प्रदीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण व्हावे, असे साकडे खासदार नारायण राणे यांनी महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे.

गणेशोत्सव आणि होळी या सणांना कोकणवासीयांच्या दृष्टीने दिवाळीच्या सणाएवढेच महत्त्व आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यासह राज्याच्या विविध भागातून चाकरमाने दरवर्षी गणेशोत्सवाला कोकणात सहकुटुंब हजेरी लावतात. मात्र, मुंबई गोवा महामार्गाची दुर्दशा झालेली असल्यामुळे कोकण वासियांना प्रवासात अनेक यातना सहन कराव्या लागतात.

वास्तविक नितीन गडकरी हे केंद्र सरकारमधील सर्वाधिक कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशभरात वेगवान आणि दर्जेदार रस्त्यांचे जाळे उभे केले आहे. अनेक प्रचंड पूल आणि बोगदे त्यांच्या कार्यकाळात उभारले गेले आहेत. याच काळात वेगवान रस्ते उभारणीचे अनेक विक्रमही प्रस्थापित झाले आहेत. मात्र, तब्बल 17 वर्षापासून सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाचे काम आपल्याला अद्याप पूर्ण करता आले नाही, याची कबुली देऊन खुद्द गडकरी यांनी अनेकदा त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली आहे.

यावर्षी तरी कोकणवासी यांचा प्रवास सुसह्य व्हावा, त्यासाठी महामार्गाचे काम जलद गतीने गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावे, या मागणीसाठी खासदार नारायण राणे यांनी गडकरी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी त्यांची भेट घेऊन कोकणवासीयांच्या भावना त्यांच्या कानावर घातल्या. गडकरी यांच्या कार्यक्षम कारकिर्दीवर मुंबई गोवा महामार्गाच्या रूपाने उमटलेला काळा डाग यावर्षी तरी धुतला जाणार का आणि कोकणवासीयांचा प्रवास सुसह्य होणार का, याची उत्कंठा सर्वांना आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading