Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बिनचेहेऱ्याचे सरकार चालणार नाही, मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा – संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव पुढे न करता विधानसभा निवडणूक लढविण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णया विरोधात जाऊन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार असल्याचेही राऊत यांनी सूचित केले आहे.

मुख्यमंत्री पदासाठी कोणाचेही नाव पुढे करायचे नाही. त्याबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर घेण्यात येईल, असे महाविकास आघाडीने सर्वसंमतीने ठरविले होते. मात्र, मुख्यमंत्री पदाचे नाव घोषित न करता निवडणूक लढविणे अवघड जाईल, असे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्रीपदी कोण असेल त्याचे नाव घोषित करण्याची मागणी केली आहे.

बिनचेहेऱ्याचे सरकार चालणार नाही

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार दाखवावाच लागेल. बिन चेहऱ्याचे सरकार मतदारांना चालणार नाही. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नावावरही महाविकास आघाडीला अनेक मतदारांनी मतदान केले आहे. अर्थात श्रेय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह तिन्ही पक्षांचे असले तरीही उद्धव ठाकरे यांचा वाटा उल्लेखनीय आहे, असे नमूद करतानाच संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading