Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अंगारकीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिराला भव्य पुष्पआरास 

पुणे : मंगलमूर्ती मोरया…ओम् गं गणपतये नम :… गणपती बाप्पा मोरया…अशा गणेशनामाच्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. अंगारकी संकष्टी चतुर्थी योग असल्याने भाविकांनी दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली. मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक पुष्पसजावट आणि विद्युतरोषणाने संपूर्ण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर उजळून निघाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरामध्ये पहाटे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रख्यात गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी गायनसेवा दिली. त्यापूर्वी ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. स्वराभिषेकानंतर गणेशयाग व विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरात पार पडले.

मंदिरावर केलेल्या पुष्पसजावटीकरीता १२०० किलो शेवंती, १८०० किलो झेंडू, गुलाब, लिली, आॅर्केड  यांसह विविध फुलांचा समावेश होता. पुष्पसजावट २१५ महिला व पुरुषांनी सलग पाच दिवस काम करुन साकारली. याशिवाय गाभा-यात अष्टविनायकांच्या प्रतिमा देखील साकारण्यात आल्या होत्या. मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून भाविकांकरीता दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी पहाटेपासूनच मोठया संख्येने गर्दी केली. श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर रस्ता, अप्पा बळवंत चौकाच्या पुढे पर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading