सातत्याने गरजुंना मदतीचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद – मुरलीधर मोहोळ
पुणे : समाजकार्याचा एक भाग म्हणून सातत्याने गरजुंना मदतीचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांनी त्यातला काही भाग वंचितांसाठी खर्च करावा आणि त्या माध्यमातून दिव्यांग मुले,विशेष मुलं, आर्थिक परिस्थिती मुळे प्रवाहातून बाजूला पडलेली मुलं यांना आधार द्यावा असेही ना. मुरलीधरअण्णा मोहोळ म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने जिव्हाळा फाउंडेशन साठी शैक्षणिक साहित्य भेट देण्याच्या कार्यक्रमात त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, जिव्हाळा फाउंडेशन संस्थेच्या शर्वरी मुठे,सुजाता जोशी, सोनिया मारणे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपा शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले,उद्योग आघाडीचे सरचिटणीस रामदास गावडे,संस्थेतील विद्यार्थिनी व इतर मान्यवर उपस्थित होते.
हिंगणे होम कॉलनी, कर्वेनगर येथे गरजू महिला व मुलांसाठी कार्यरत जिव्हाळा फाऊंडेशन संस्थेचे कार्य आदर्शवत असून सौ.शर्वरी मुठे यांनी हे सेवाकार्य अधिक मोठ्या प्रमाणात करावे त्यासाठी सर्व साधन सामग्री उपलब्ध करण्यास मी मदत करेन असं ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.संदीप खर्डेकर क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्यात आपले योगदान देत असून राजकारणापेक्षा समाजकारण करणे हेच शाश्वत कार्य असल्याचे ही मा.चंद्रकांतदादा म्हणाले.
माझे स्नेही मुरलीधरअण्णा मोहोळ सव्वा लाख मतांनी विजयी झाले याचा आनंद साजरा करायचा होता, त्यांना शुभेच्छा द्यायच्या होत्या, मात्र त्यासाठी फ्लेक्स न लावता गरजू संस्थांना मदत करावी असा विचार मनात आला आणि मग क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून विविध संस्थांना सव्वा लाख रुपयांची मदत देत आहे असे फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. जिव्हाळा फाउंडेशन ला सुमारे 50000 रुपयांचे शालेय साहित्य तर अन्य संस्थांना सायकल, व्हीलचेयर व इतर उपयुक्त साहित्य देऊन मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाचा आणि राज्यमंत्री पदाचा आनंद साजरा करत असल्यामुळे समाधान लाभत असल्याचे फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
