…….. तर त्यांनी आपल्या भुजांमधील बळ दाखवावे – विजय वडेट्टीवार
मुंबई: राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पक्षात आणि सरकारमध्ये अन्याय होत असेल तर त्यांनी आपल्या भुजांमधील बळ दाखवावे. एक घाव दोन तुकडे करावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भुजबळ यांना केले आहे
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवावी असा दिल्लीचा संदेश असल्याचे सांगत असतानाही भुजबळ यांची उमेदवारी अखेरच्या क्षणापर्यंत जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे भुजबळ यांनी ही निवडणूक न लढविणे पसंत केले. त्यानंतर राज्यसभेवर जाण्याची इच्छा असतानाही लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना वडेट्टीवार यांनी भुजबळ यांना डिवचले आहे.
अजित पवार यांच्याबरोबर जाण्याची इच्छा नव्हती पण….
छगन भुजबळ यांची अजित पवार यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसण्याची इच्छा नव्हती. मात्र, केंद्रीय तपासणी यंत्रणांच्या चौकशीचा धाक दाखवून त्यांना तिकडे अखेरच्या क्षणी आणले गेले असा गौप्यस्फोट वडेट्टीवार यांनी केला आहे. छगन भुजबळ यांनी स्वतःच खासगीत बोलताना हा खुलासा केला असल्याचा त्यांचा दावा आहे.
पक्षात ज्येष्ठ असूनही भुजबळ यांना सातत्याने डावलले जात आहे. याचे कारण त्या पक्षात साठमारी सुरू आहे. ज्याला जे मिळेल ते तो ओरबाडून घेत आहे. आता भुजबळ यांनी, तू रडल्यासारखे कर, मी मारल्यासारखे करतो, अशी भूमिका घेऊन गप्प बसू नये. वास्तविक भुजबळ हे, आले अंगावर तर घे शिंगावर, या वृत्तीचे व्यक्तिमत्व आहे. मात्र, सध्याच्या काळात ते केवळ कुरकुर करीत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला ती अपेक्षा नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
