केंद्रात मंत्रिपद मिळाले तर संधीचे सोने करून दाखवू – सुनेत्रा पवार
बारामती: केंद्रात मंत्रिपद मिळाले तर त्याचा चांगले काम करण्यासाठी पुरेपूर उपयोग करून या संधीचे सोने करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केला आहे.
प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेतील जागेवर सुनेत्रा पवार यांची अजित पवार गटाकडून वर्णी लावण्यात आली आहे. केंद्रात मंत्रिमंडळ स्थापन करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून अजित पवार गटाला राज्यमंत्री पद देऊ करण्यात आले होते. मात्र, पटेल यांनी यापूर्वी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असल्यामुळे अजित पवार गटाने राज्यमंत्री पद नाकारले.
आता सुनेत्रा पवार राज्यसभेत गेल्याने त्यांची केंद्रीय मंत्री म्हणून वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. बारामतीत भावी केंद्रीय मंत्री म्हणून त्यांचे फलकही झळकले आहेत. सुनेत्रा पवार यांनीही यावर प्रतिक्रिया देत या चर्चेला हवा दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्याबद्दल पक्षात नाराजी असल्याची चर्चा आहे. इतर मागासवर्गीय समाजाचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांना खासदारकी प्राप्त करण्याची इच्छा होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेरच्या क्षणापर्यंत नाव जाहीर न झाल्याने भुजबळ यांनी ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यसभेवर आपल्याला संधी दिली जाईल,, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठविण्याचा निर्णय झाल्याने भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. राजकारणात प्रत्येक वेळी आपल्याला हवे तेच घडेल, असे होत नसल्याचे सांगत भुजबळ यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र भुजबळ नाराज असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. आपण नाराज नाही हे भुजबळ यांनी स्वतः स्पष्ट केले असूनही माध्यमांकडून जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या जात असल्याची टीका ही अजित पवार यांनी केली आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय पक्षाच्या बैठकीत सर्वसंमतीने झाला असल्याचा त्यांचा दावा आहे.
