भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार ?
मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीची सुमार कामगिरी, अजित पवार यांना सोबत घेतल्याबद्दल संघाची नाराजी, या भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक एकट्याने लढवावी का, याबाबत पक्षात चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः निवडणूक स्वबळावर लढवावी आणि निकालानंतर आवश्यकतेनुसार युती आघाडी करावी, असा विचार प्रवाह पक्षात जोर धरू लागला आहे.
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला. मागच्या निवडणुकीत भाजपने राज्यातील 23 जागांवर विजय प्राप्त केला होता. या निवडणुकीत भाजपला केवळ नऊ जागा मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून एक अंतर्गत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवल्यास काय फायदा होऊ शकतो आणि काय नुकसान होऊ शकते याबाबतची चाचणी केली जाणार आहे.
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने सात जागांवर विजय मिळवला आहे. त्यांचा स्ट्राइक रेट भाजपपेक्षाही अधिक आहे. मात्र, त्यांची आमदार संख्या शिवसेना ठाकरे गटापेक्षा कमीच आहे. त्यामुळे शिंदे यांच्या गटातील काही आमदार आणि नेते अस्वस्थ असून ते पुन्हा घर वापसी करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे मानले जाते.
निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या निवडणुकीत त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. संघ आणि भाजपाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबर काम करण्यास उत्सुक नसल्याचे या निवडणुकीत बघायला मिळाले आहे. शिवाजीष्ठ समाजसेवकांना हजारे यांच्या पुढाकारामुळे 25 हजार कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचे भूत पुन्हा अजित पवार यांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. याशिवाय अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदारही स्वगृही परतण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवार यांना बरोबर ठेवल्यास फायदा अधिक होईल की नुकसान याची चाचपणी केली जात आहे.
