MNS : अडीचशे जागांवर कामाला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे,’ हे धोरण अमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना तब्बल अडीचशे जागांवर कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही घटक पक्षातील जागा वाटपाचे धोरण अथवा सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही, ही बाब राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निदर्शनास आणून दिली. मी कोणत्याही पक्षाकडे किंवा युती, आघाडीकडे जागा मागण्यासाठी किंवा जागा वाटपाची बोलणी करण्यासाठी जाणार नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेली मते ही त्यांची स्वतःची मते नसून मोदी विरोधकांनी आपली मते त्यांच्या पारड्यात टाकली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणुकीच्या रिंगणात कधी उतरणार, याची मराठी माणूस वाट पाहत आहे. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल लोकांच्या मनात राग असून मराठी माणसाचा पाठिंबा मनसेला निश्चितपणे मिळेल, असा विश्वास राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
सध्या विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे 105 आमदारांचे संख्याबळ आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या दोन्ही पक्षांचे 40-40 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भाजपाकडे तब्बल 80 80 जागांची मागणी केली आहे. त्यात मनसेने महायुतीत दाखल होऊन विधानसभा निवडणुकीत मतदार संघाची मागणी केली तर कितीशा जागा पदरात पडणार, असा विचार करून राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
