Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

भाजपामधील मैत्री निभावणारी पिढी संपुष्टात – प्रकाश महाजन

मुंबई : नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीला बिनशरथ पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना शपथविधी समारंभाचे निमंत्रण न दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. भाजपामधील मैत्री निभावणारी पिढी संपुष्टात आल्याची टीका मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. 

लोकसभा निवडणुकीत कोणतीही अट न घालता मनसेने महायुतीला पाठिंबा दिला. पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीच्या अनेक उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आणि ते उमेदवार निवडूनही आले. आमच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या प्रचारासाठी कष्ट घेतले. त्यामुळे आमच्या नेत्यांना शपथविधीच्या समारंभाचे निमंत्रण असते तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद झाला असता. मात्र गरज असताना दाराचे उंबरठे शिजवायचे आणि काम झाल्यावर दार बंद करायचे, या वृत्तीचे परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहेत, अशा शब्दात महाजन यांनी भाजपवर निशाणा साधला.

 विधानसभा निवडणुकीत हव्या 20 जागा 

लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी मनसेने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला. त्याच्या बदल्यात लोकसभेच्या कोणत्याही मतदार संघाची मागणी पक्षाने केली नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेने महायुतीकडे वीस जागांची मागणी केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि बृहन्मुंबई परिसरातील विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. वर्सोवा मतदारसंघातून खुद्द शालिनी ठाकरे तर वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. दादरमधून नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्याची मनसेची इच्छा आहे.

 मनसेने महायुतीकडे वरळी, दादर माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुण्यातील एका मतदारसंघाची मागणी केली आहे. 

 दरम्यान, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट या दोन्ही पक्षांनी 80-80 जागांची मागणी केली आहे. त्यात आता मनसेही महायुतीत नवीन वाटेकरी झाला आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटप करताना भाजपच्या नाकी नऊ येणार हे निश्चित आहे. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading