NDA सरकारच्या भवितव्याविषयी आपल्याला काही देणे घेणे नाही – उद्धव ठाकरे
मुंबई: केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ झालेल्या सरकारच्या भवितव्याविषयी आपल्याला काही देणे घेणे नाही. आपल्याला देशाच्या भवितव्याची काळजी आहे, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. देशातील जनतेनही भाजपला खडे चारले आहेत. यापासून धडा घेऊन आता तरी भाजप सुधारणार का? केंद्रात सत्तेवर असलेले सरकार देशासमोर असलेल्या समस्यांचे निवारण करणार की त्याबद्दल आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षांना संपवण्याचे उद्योग करणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळल्यानंतर तब्बल वर्षभराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत विधान केले आहे. या घटनेचे गांभीर्य सरसंघचालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षभराचा कालावधी घेणारी संघाची संपर्क यंत्रणा सुधारणे गरजेचे आहे. आता खुद्द भागवत यांनी मणिपूर कडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केल्यानंतर तरी पंतप्रधान मनिपुर ला जाणार का, असा प्रश्नही ठाकरे यांनी विचारला.
काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंसाचाराने पेट घेतला आहे. कलम 370 रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. प्रत्यक्षात हे कलम रद्द करण्यात आलेले नाही तर स्थगित करण्यात आले आहे, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चंद्राबाबू नायडू असे नेते शपथविधीचे सोहळे साजरे करत असताना इकडे लोकांचे जीव जात आहेत. आपल्या सुरक्षा रक्षकांवर हल्ले होत आहेत. अशा परिस्थितीत सरकार त्याकडे लक्ष देणार की आपल्या रेकॉर्डचे तुणतुणे वाजवत राहणार, असा सवालही ठाकरे यांनी केला.
