…….. त्यांनी एकदा तरी जाळीदार टोपी परिधान करावी अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली अपेक्षा
मुंबई: आपण मुस्लिम समाजाचा द्वेष करीत नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाला पटवून देण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी एकदा तरी जाळीदार टोपी परिधान करावी. त्यामुळे आपण वेगळे नाही ही भावना दिसून येईल, अशी अपेक्षा विख्यात अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.
नसिरुद्दीन शाह हे आपल्या सशक्त अभिनयाप्रमाणेच सामाजिक आणि राजकीय विषयावरील आपल्या रोखठोक भूमिकेबद्दलही प्रसिद्ध आहेत. एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत आपले परखड मत व्यक्त केले आहे. या मुलाखतीत त्यांनी मुस्लिम कट्टरपंथीयांनाही खडे बोल सुनावले आहेत.
लोकसभा निवडणुकीचा हा निकाल आनंद देणारा ठरला आहे. ही निवडणूक जिंकणारे, हरणारे, सर्वसामान्य जनता आणि सरकार या सर्वांनाच विचार करायला लावणारा या निवडणुकीचा निकाल आहे. राजकारण आणि अन्य सर्व क्षेत्रातूनच द्वेष पसरवणारी वक्तव्य बंद होणे गरजेचे आहे. लोकसभेत महिलांची वाढलेली संख्या मला बघायची आहे, असेही शाह यांनी सांगितले.
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणानंतर समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधी मोदी यांना भेटले. त्यावेळी काही मुस्लिम मौलवींनी मोदी यांना दिलेली जाळीदार टोपी परिधान करण्यास त्यांनी नकार दिला होता. या घटनेचा संदर्भ घेऊन शाह यांनी मोदी यांच्यावर टीका केली. मोदी हे प्रचंड अहंकारी आहेत. आपली चूक कबूल करण्याचा मोठेपणा त्यांच्याकडे नाही. आपण मुस्लिमांचा द्वेष करत नाही हे त्यांनी सिद्ध करण्याची गरज आहे. तशी ही मोदी यांना विविध प्रकारची टोपी परिधान करण्याची आवड आहे. त्यामुळे मोदी यांनी जाळीदार टोपी परिधान करून आपण इतर भारतीयांपेक्षा वेगळे नाही, ही भावना मुस्लिमांमध्ये रुजवावी, अशी अपेक्षा नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त केली.
