गायकाच्या भूमिकेशी समरस होणारा वादक असेल तर कार्यक्रम अधिक रंगतो – पं. संजीव अभ्यंकर
पुणे : गायक जेव्हा व्यासपीठावर आपल्या कलेचे सादरीकरण करतो तेव्हा साथसंगत करणाऱ्या वादकाची भूमिका देखील महत्वपूर्ण असते. यावेळी वादकाने केवळ साथ म्हणून वादन करता कामा नये. वादन करत असताना गायकाची सौंदर्यदृष्टी, विचारधारा समजून वादकाने समरस होऊन साथसंगत केल्यास कार्यक्रम अधिक रंगतो, अशा शब्दांत मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पं संजीव अभ्यंकर यांनी वादकाची भूमिका विशद केली.
सुप्रसिद्ध संवादिनीवादक तन्मय देवचके यांच्या स्वरानुजा या म्युझिक अकादमीच्या वतीने नुकतेच ‘उगम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी डॉ अभ्यंकर बोलत होते. ‘उगम’ या कार्यक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष असून कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी अभय देवचके उपस्थित होते.
कार्यक्रमा दरम्यान बोलताना डॉ संजीव अभ्यंकर म्हणाले, “एकल सादरीकरण आणि साथसंगत करीत असताना प्रत्येक वादकाची समरस भूमिका महत्त्वाची असते. प्रत्येक कलाकार आपल्या कलेवर प्रेम करतच असतो. मात्र ज्याच्यासोबत आपण वादन करीत आहोत त्या गायकासोबत प्रामाणिकपणे एकरूप होऊन सादरीकरण करणारे वादक फार कमी असतात. कलाकारामध्ये अहम नसावा मात्र स्वाभिमान आणि विनम्रता असणे गरजेचे आहे.”
आज संवादिनीला एकल वाद्य म्हणून लोकप्रियता मिळत आहे. हे होत असताना यामध्ये तन्मय देवचके सारख्या संवादिनीवादकाची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे, असे मला वाटते. तन्मयने केलेल्या भविष्यवेधी विचाराने इतर अनेक शिष्यांना देखील तो मार्ग दाखवीत आहे. तन्मय करीत असलेले काम पुढील १०-१५ वर्षांत किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला उमगेल. तो आज शिष्यांना कलासमृद्ध करत असून कला दृष्टी देत असल्याचे डॉ अभ्यंकर यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात तन्मय देवचके यांच्या विद्यार्थ्यांच्या विशेष सादरीकरणाने झाली. यावेळी लहान / शालेय गटातील मुलांनी राग भीमपलासी, राग श्याम कल्याण, राग तिलक कामोद यांचे सादरीकरण केले. यानंतर तन्मय देवचके यांचे शिष्य असलेले निलय साळवी व अथर्व कुलकर्णी यांनी राग रागेश्री प्रस्तुत केला, त्यांना ओंकार तोडकर यांनी तबलासाथ केली.
यानंतर पं संजीव अभ्यंकर यांच्या हस्ते तन्मय देवचके यांचे आजोबा गोपाळ देवचके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री गोपाळ देवचके शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मंगळूर येथील आश्वासक संवादिनीवादक विश्वजित किणी यांस यावर्षी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मानचिन्ह व विद्यार्थ्याच्या सांगीतिक शिक्षणाचा संपूर्ण खर्च असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात तन्मय देवचके यांचा ‘तन्मय इन हार्मनी’ हा विशेष कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये तन्मय यांनी बनविलेल्या काही नवीन रचनांचे सादरीकरण झाले. यानिमित्ताने उपस्थितांनी संवादिनीवादनातील एक समृद्ध प्रयोग अनुभविला. कार्यक्रमामध्ये शास्त्रीय संगीतापासून सुगम संगीत, जॅझ, लॅटिन म्युझिकचा अंतर्भाव असलेल्या बँडने स्वत: संगीतबद्ध केलेल्या रचना सादर झाल्या. सुप्रसिद्ध नट ओम भूतकर यांनी लिहिलेले आणि तन्मय देवचके यांनी संगीतबद्ध केलेले गाणे रसिकांची दाद मिळवून गेले. यावेळी तन्मय पवार (गिटार), जय सूर्यवंशी (की बोर्ड), अभिषेक भूरूक (ड्रम्स), सोहम गोराणे (तबला), नीरज पंडित (बेस गिटार) यांनी साथसंगत केली. मानसी आरगडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
