Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

कलाकाराने चित्र काढताना मिळणाऱ्या आनंदावर लक्ष द्यावे – डॉ. सुधाकर चव्हाण

पुणे : तुम्ही हौशी कलाकार आहात की व्यावसायिक, तुमच्या चित्राला कोणी चांगल म्हणतंय की नाही या गोष्टींकडे फारसे लक्ष न देता तुम्हांला चित्र काढताना मिळणारा आनंद जास्त महत्वाचा आहे. तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करा तुमची प्रगती नक्की होईल असा सल्ला ज्येष्ठ कला शिक्षक डॉ. सुधाकर चव्हाण यांनी चित्रकारांना दिला.

घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कला दालनात होत असलेल्या दहाव्या व्हीनस कला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रसिद्ध कला संग्रहक व झपूर्झा संग्रहालयाचे संस्थापक अजित गाडगीळ यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी, रावसाहेब गुरव, सुभाष पवार, प्रियंवदा व संजीव पवार आदि मान्यवर अस्थित होते.

यावेळी प्रसिद्ध शिल्पकार – चित्रकार प्रमोद कांबळे यांच्या सन्मानार्थ विषेशरित्या तयार करणात आलेल्या नव्या ब्रशच्या मालिकेचे अनावरण करण्यात आले. सदर प्रदर्शन हे येत्या १० जून पर्यंत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे.

एखाद्या कलाकाराच्या सन्मानार्थ ब्रशची नवीन मालिका सादर करणे यासारखा त्या कलाकाराचा दुसरा सन्मान नाही असे सांगत डॉ. चव्हाण म्हणाले की पुण्यात गेल्या दहा – बारा वर्षात चित्रकार म्हणजे काय तर भिकेचे लक्षण अशी चित्रकारांसंबंधी असलेली नकारात्मकता बदलताना दिसते आहे. दृश्य कलेमध्ये पुण्याची नवीन ओळख निर्माण होताना दिसते आहे. पहिले पुण्यात आले की सारसबाग, शनिवार वाडा येथे आवर्जून भेट देण्यात येत असे. परंतु आता त्याबरोबरच कलाप्रेमी झपूर्झा सारखे उत्क्रुष्ट संग्रहालय, सुदर्शन रंगमंच येथे झालेले नवीन अद्ययावत असे कलादालन यांना भेट देतात तर चित्रकलेसाठी आवश्यक असे साहित्य व्हीनस ट्रेडर्स मध्ये खरेदी करण्याचा आनंद घेतात असे आपल्याला दिसते, असे प्रतिपादन डॉ चव्हाण यांनी केले. तसेच राजा केळकर संग्रहालयाप्रमाणे अजित गाडगीळ यांनी आपला अमूल्य असा व्यक्तिगत कलावस्तूंचा संग्रह झपूर्झाच्या माध्यमातून रसिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांचा डॉ चव्हाण यांनी विशेष उल्लेख केला.

व्यवसाय करत असताना आपण कला क्षेत्राचे काही देणं लागतो या भावेनेने विविध क्षेत्रातील कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या व्हीनसच्या या उपक्रमाचे अजित गाडगीळ यांनी कौतुक केले. याप्रसंगी विविध श्रेणीतील चित्रकारांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करणात आली. विनया देसाई यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आर्ट पुणे फाउंडेशन आणि व्हीनस ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून यामध्ये शनिवार दि. ८ जून रोजी सकाळी ११ वाजता चित्रकला विषयातील एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षांविषयी तर ‘ग्लोबल चाईल्ड प्रोडिजी’ पुरस्काराने सन्मानित अद्वैत कोलारकर या बालचित्रकाराची कार्यशाळा रविवार दि. ९ जून रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होईल. दोन्ही कार्यशाळा विनामूल्य आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading