fbpx
Sunday, June 16, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘होय महाराजा’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला…

 

‘होय महाराजा’ हा मराठी चित्रपट घोषणा झाल्यापासून वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. लक्षवेधी शीर्षक असलेल्या या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याची सिनेप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. दिवसागणिक कुतूहल वाढवणाऱ्या ‘होय महाराजा’चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला नेटकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

एलएमएस फिल्म्स प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘होय महाराजा’चं दिग्दर्शन शैलेश एल. एस. शेट्टी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संचित बेद्रे यांनी लिहिले आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर नुकत्याच रिलीज करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये क्राईम-कॅामेडी असलेल्या ‘होय महाराजा’ची खरी झलक पाहायला मिळते. या कथेतील प्रथमेश परबने साकारलेलं रमेशचं मुख्य कॅरेक्टर लक्ष वेधून घेतं. सुटा-बुटात इंटरव्ह्यूला निघालेल्या प्रथमेशची बोलबच्चनगिरी ट्रेलरमध्ये आहे. मामाला मात्र आपल्या भाच्यावर खूप विश्वास असतो. आपला भाचा एक दिवस खूप मोठ्या उंचीवर जाईल असा त्यांना विश्वास आहे. मामाची व्यक्तिरेखा अभिजीत चव्हाणने साकारली आहे. स्वप्नांच्या दुनियेत रमलेल्या रमेशला अचानक आयशा (अंकिता लांडे) भेटते आणि हि ‘अनयुजवल लाफ स्टोरी’ पुढे सरकते. संदीप पाठकने साकारलेला भाई, समीर चौघुलेचा बॉसचा दरारा आणि वैभव मांगलेच्या रूपातील अण्णाही ‘होय महाराजा’ म्हणत हास्याची कारंजी फुलवून धमाल करणार आहेत. थोडक्यात काय तर फुल टू धमाल असलेला हा चित्रपट ३१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘होय महाराजा’मध्ये प्रथमेश अंकिता ए. लांडेसोबत जमली असल्याने या चित्रपटातील एका नव्या कोऱ्या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच खुणावणार आहे. या दोघांच्या जोडीला अभिजीत चव्हाण, संदीप पाठक, वैभव मांगले, समीर चौघुले आदी एका पेक्षा एक दिग्गज कलाकारांची फौज प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत फाईट मास्टर मोझेस फर्नांडिस यांनी अॅक्शन दिग्दर्शन केलं असून, संतोष फुटाणे यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. डिओपी वासुदेव राणे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निलेश नवनाथ गावंड यांनी केलं आहे. गुरू ठाकूरने गीतलेखन केलं असून, संगीतकार चिनार-महेश यांनी स्वरसाज चढवला आहे. पार्श्वसंगीत अमेया नरे, साजन पटेल यांनी, कोरिओग्राफी फुलवा खामकरने, तर वेशभूषा जान्हवी सावंत सुर्वे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading