Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

विकास-प्रगतीच्या ओघात निसर्गातील पारंपरिक चातुर्य गमाविले : मनोज बोरगावकर


पुणे : नदी-निसर्ग वाचायचा असतो, हे बाळकडू मला बालपणापासूनच मिळाले. नदी म्हणजे मला आईचे विस्तारलेले गर्भाशय वाटते. नदीच्या अव्यक्त हाकांना प्रतिसाद देताना माझी तिच्याशी नाळ जुळली. नदीने मला खऱ्या अर्थाने जीवनाविषयक अनोख्या कहाण्या दिल्या. निसर्ग आपल्याला काही तरी सांगू पाहत असतो हे संस्कार माझ्यावर झाले आहेत, असे प्रतिपादन ‌‘नदीष्ट‌’ पुस्तकाचे लेखक मनोज बोरगावकर यांनी केले. नदी जीवंत राहिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून विकास-प्रगतीच्या ओघात आपण निसर्गातील पारंपरिक चातुर्य गमाविले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
पुस्तक चळवळ राबविणाऱ्या ‌‘भावार्थ‌’तर्फे  शब्दयात्री या उपक्रमाअंतर्गत बोरगावकर यांच्याशी संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. ‌ प्रसाद मिरासदार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 
नदीच्या ओढीमुळे आपण नादीष्ट आहोत याची जाणीव झाल्याचे सांगून बोरगावकर म्हणाले, नदी चांदणे पिऊन पवित्र होते की, चांदणे नदीचे पाणी पिऊन आपली तहान भागविते या अलौकिक भावनेतून नदी आपल्यातही उतरत असते ही जाणीव झाली. ‌‘नदीष्ट‌’ या पुस्तकातील दादाराम, बामनवाड, तृतीयपंथी सगुणा, भिकाजी, सकिना बी या व्यक्तिरेखांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्याशी जुळलेली नाळ, उलगडत गेलेल्या गुढ कहाण्या याविषयी मनमोकळा संवाद साधून ते म्हणाले, बालपण खेड्यात गेल्याने निसर्ग काय सांगतो हे ऐकण्याचे संस्कार माझ्यावर होत गेले. निसर्ग-नदीपुढे अहंकाराचे ओझे सहजतेने कसे खाली पडते ही दृष्टी दिली. नदीचा ऱ्हास, तिची ससेहोलपट पाहून त्याच चरे माझ्या हृदयात खूप आतपर्यंत गेल्याने मी ‌‘नदीष्ट‌’चे लिखाण करू शकलो.
नदीला स्त्रीच्या रुपात पाहताना तिच्या पदराला हात घालणे हा पुरुषार्थ नाही तर तिच्या पदराआडचे दु:ख समजून घेणे हा खरा पुरुषार्थ आहे, असे ते म्हणाले.
दादाराम यांनी नदीविषयी संस्कार करताना रात्री नदीत उतरायचे नसते, कारण ती झोपलेली असते. म्हणजेच नदीतील जीवजंतू भावसमाधीत असतात आणि त्यांच्या अस्तित्वानेच नदी जीवंत असते. नदी पवित्र राहिली नाही तर निसर्गाचा समतोल ढासळतो. निसर्गाचा समतोल ढासळू नये यासाठी नदी जीवंत राहिली पाहिजे, वाहती राहिली पाहिजे. कलावंताचे इमान शाबूत असले पाहिजे हे मला माणूस असण्याचे वैशिष्ट्य म्हणून जाणवते.
समुद्र आकर्षित करतो या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, नदी जेव्हा बेभान, बेफाम होत नाही तो पर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही त्या प्रमाणेच मी देखील अजून बेभान, बेफाम झालेलो नाही त्यामुळे समुद्राकडे आकर्षित झालो नाही.
प्रास्ताविक कीर्ती जोशी यांनी केले तर स्वागत  महान कोरगावकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading