Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

ग्रामीण भागातील विकासामध्ये सहकारी पतसंस्थांचे महत्त्व अनन्य साधारण

पुणे : खाजगी, राष्ट्रीयकृत बँका चांगल्या पद्धतीने काम करत असताना नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण आणि शहरी भागात वेगळा ठसा उमटवत आहेत. राज्यातील साडे तेरा हजार पतसंस्था ग्रामीण आणि शहरी भागात काम करत आहेत. ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने आर्थिक गरजा भागवण्याचे काम या सहकारी पतसंस्था करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासामध्ये सहकारी पतसंस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केले.

श्री तुळशीबाग नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्त पदी निवड झाल्याबद्दल शैलेश कोतमिरे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. राज्याचे सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ॲड. प्रताप परदेशी, जीवन हेन्द्रे,विकास पवार, नितीन पंडित, काशिनाथ दंडवते यावेळी उपस्थित होते.

शैलेश कोतमिरे म्हणाले, सहकारी संस्थांची निर्मिती गरज म्हणून झाली. सावकारीला पर्याय म्हणून या संस्था उभ्या राहिल्या. खाजगी बँका आधुनिकतेची कास धरून काम करत असताना सहकार क्षेत्रातील बँक देखील परिवर्तन करत आहेत.

हेमंत रासने म्हणाले, सहकार क्षेत्रातील बँकांमध्ये काळानुरुप अनेक चांगले बदल होत आहेत. या बँका आणि पतसंस्था अडचणीच्या काळात नागरीकांच्या पाठीशी आर्थिक स्त्रोत म्हणून भक्कमपणे उभ्या राहतात. परंतु दिलेल्या कर्जाची वसुली हे सगळ्यात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असते. कर्जवसुली योग्य पद्दतीने, विनासायास, वेळेत झाली तर, बँकाचा एनपीए चांगला राहतो.

श्रीकृष्ण वाडेकर म्हणाले, सहकार क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, हे शैलेश कोतमिरे यांनी दाखवून दिले. त्यांनी जो विश्वास निर्माण केला त्यामुळे त्यांची सहकार आयुक्तपदी नियुक्ती झाली, असेही त्यांनी सांगितले. सूर्यकांत पाठक म्हणाले, सहकार क्षेत्रात अनेक लोक काम करत असतात परंतु कोतमिरे यांनी एक वेगळा पायंडा पाडला आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांनी काम केले आहे.

ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, तुळशीबागेतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांची पिळवणूक थांबविण्यासाठी आणि त्यांना आर्थिक सक्षमता मिळवून देण्यासाठी तुळशीबाग नागरिक पतसंस्थेची सुरुवात झाली, असेही ते म्हणाले. जीवन हेंद्रे यांनी प्रास्ताविक केले. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली खटावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading